सरकारच्या दुर्लक्षामुळेच आंदोलनांची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:50 AM2019-08-28T06:50:47+5:302019-08-28T06:51:58+5:30

शिक्षक आमदारांचा आरोप; विनाअनुदानित शाळेतील शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Time of agitation due to government neglect | सरकारच्या दुर्लक्षामुळेच आंदोलनांची वेळ

सरकारच्या दुर्लक्षामुळेच आंदोलनांची वेळ

Next

मुंबई : विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन आझाद मैदान येथे सुरू आहे. विनाअनुदानित शाळांसाठी सरकारने घोषणा केल्या, पण अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे हे शिक्षक पगारापासून वंचित आहेत. त्यांच्या प्रश्नांचा शिक्षक आमदारांनीही पाठपुरावा केला. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप शिक्षक आमदारांनी केला आहे. दरम्यान, मंगळवारी विनाअनुदानित शाळेतील एका शिक्षकाने झाडावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षक आमदारांनी मंगळवारपासून मंत्रालयात आमरण उपोषण सुरू केले आहे. आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे, डॉ. सुधीर तांबे आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.
आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की, विनाअनुदानित शिक्षक आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सहभागी झाले आहेत. शिक्षकांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी विधानसभेत सरकारने घोषणा केल्या. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. हे सरकार संवेदनशून्य आहे. मागण्या मान्य न झाल्याने एका शिक्षकाने गडचिरोलीत आत्महत्या केली तरी सरकारला जाग आली नाही. उलट न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवरच सोमवारी लाठीहल्ला करण्यात आला. त्यामुळे शिक्षकांवर करण्यात आलेल्या या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षक आमदारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.


२० टक्के अनुदान असणाºया शाळांना १०० टक्के अनुदान देण्यात यावे, मूल्यांकन केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच २०१२-१३ च्या वर्ग तुकड्यांना १०० टक्के अनुदान द्यावे आदी आमच्या मागण्या आहेत. यावर बुधवारी होणाºया मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे, असेही पाटील यांनी याबाबत बोलातना सांगितले.
दरम्यान, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान मंगळवारी एका शिक्षकाने झाडावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही शिक्षकांनी त्याची समजूत काढली. त्यानंतर हा शिक्षक खाली उतरला.

आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार योग्य आहे का?
आझाद मैदानात सोमवारी विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार केला. शिक्षकांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार शोभतो का, असा सवाल शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार व शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केला आहे. तसेच उद्याची भावी पिढी घडविणाºया शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार करणे हे कृत्य अशोभनीय आहे, असे म्हणत कायंदे यांनी या संपूर्ण घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

शिक्षकांवरील लाठीहल्ल्याचा शाळांमध्ये निषेध
आझाद मैदान मुंबई येथे पोलिसांकडून शिक्षकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा शिक्षकांनी निषेध नोंदविला आहे. कांदिवलीतील सरस्वती विद्यालय, धुळे येथील पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आदी शाळांमध्ये मंगळवारी निषेध नोंदविण्यात आला.

...त्यानंतर शिक्षक आमदारांनी उपोषण घेतले मागे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून शिक्षक आमदारानी मंत्रालयात सुरू असलेले उपोषण रात्री मागे घेतले. बुधवारी सकाळी ८ वाजता सात शिक्षक आमदार, विरोधी पक्षनेता यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात बैठक होईल.
- प्रशांत रमेश रेडीज, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती, अध्यक्ष मुंबई

Web Title: Time of agitation due to government neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक