मुंबई - विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवारी बोलविण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर सत्ताधारी नेत्यांनीही त्यांचे अभिनंदन केले. यावेळी, मी पुन्हा येईन असं सांगितले पण टाइमटेबल सांगितलं नव्हतं म्हणून काही वेळ वाट बघा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोलाही लगवाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही एका शायरीच्या माध्यमातून सत्ताधारी नेत्यांना प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या या शायरीच अमित शहांशी कनेक्शन आहे.
विधानभवनात सत्ताधारी पक्षातील नेत्यांचो आभार मानताना, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा''. मी पुन्हा येईन... वरुन विरोधकांनी काढलेल्या चिमट्यांना त्यांनी या शायरीतून प्रत्युत्तर दिले. त्याचप्रमाणे विरोधी पक्षात काम करणं हा आमचा डीएनए आहे. जनतेच्या हिताचं काम करण्यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. फडणवीसांच्या या शायरीचं कनेक्शन भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आहे. अमित शहा यांनी 9 वर्षापूर्वी हीच शायरी गुजरातच्या विधिमंडळात म्हटली होती. सन 2010 मध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी, अमित शहांनी हीच शायरी म्हटली होती. महाराष्ट्राच्या विधानभवनात देवेेंद्र फडणवीस यांनी अमित शहांच्या शायरीची कॉपी केली. विशेष म्हणजे, 3 महिन्यानंतर अमित शहांची सुटका झाली होती, त्यावेळी पी. चिंदबरम हे देशाचे गृहमंत्री होते. मात्र, आज अमित शहा देशाचे गृहमंत्री असून पी. चिदंबरम हे सध्या तुरुंगात आहेत. नियताची खेळ म्हणा किंवा योगायोग पण हे सत्य आहे.
दरम्यान, आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय हेच आहेत. छत्रपतींचे सेवक म्हणूनच आम्ही काम केले. बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही नावं वंदनीयच आहेत. ही नावं कधीही घ्या, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात शपथ घेताना जी तरतूद केली आहे. त्याला अनुसरुन शपथ घ्यायला हवी होती. पण, शपथ घेताना संविधानाची तरतूद पाळली नाही. जेव्हा जेव्हा नियमाला धरुन काम होणार नाही. कितीही चिडला, कितीही रागवला तरीही मला दिलेली जबाबदारी ही नियमाला धरुन, संविधानाला अनुसरुन काम करत राहणार आहे, असे सांगत फडणवीसांनी भाजपावर केलेले आरोप फेटाळून लावले.