'जनतेने वेळोवेळी गृहीत धरणाऱ्यांना जमिनीवर आणलंय'; बाळा नांदगावकरांची सूचक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 03:19 PM2022-08-28T15:19:35+5:302022-08-28T15:20:03+5:30
बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत राज्यात सध्या सुरु असणाऱ्या घडमोडींवर भाष्य केलं.
मुंबई- मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात केली. सर्व राजकीय पक्षांमध्ये मनसेने याबाबत आघाडी घेतली आहे. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केले. 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे. मनसेच्या या सदस्य नोंदणीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
मनसेचे बाळा नांदगावकर यांनीही आज सदस्य नोंदणी केली. यावेळी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत राज्यात सध्या सुरु असणाऱ्या घडमोडींवर भाष्य केलं. सध्याचे राजकारण जनता उघड्या डोळ्याने बघत आहे. जनतेला कायम गृहीत धरणाऱ्यांना या जनतेने वेळोवेळी लोकांना जमिनीवर आणले आहे. जनता मूक जरी वाटत असली तरी जनतेचे कान आणि डोळे हे कायम कार्यरत असतात. हे नमूद करण्याचे कारण म्हणजे नुकतीच आपल्या पक्षाने सदस्य नोंदणीची सुरवात केली आहे.
मी अनेक वर्षांपासून कायम सांगत आलोय की मनसे हा पक्ष नव्हे तर तो परिवार आहे. कोणताही परिवार हा तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा सगळेजण पूर्ण मनाने परिवाराच्या प्रमुखाला साथ देतात. आपल्याला सगळ्यात खंबीर असा परिवार प्रमुख लाभले आहेत गरज आहे ती त्यांना पूर्ण साथ देण्याची. मी माझी सदस्य नोंदणी केली आहे. तुम्ही देखील करा व जवाबदारी घेऊन इतरांना देखील पक्षात मोठ्या संख्येने सामील करून घ्या, असं आवाहन बाळा नांदगावकरांनी केलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी सोपवत असल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगानुसार दर तीन- चार वर्षांनी पक्षाला सदस्य नोंदणी करावी लागते. यंदा मोठ्या प्रमाणावर सदस्यनोंदणी होणार आहे. त्यामुळे आपणही लोकापर्यंत जास्त वेगाने पोहोचायला हवे, मनसे देखील लवकरच सदस्य नोंदणी अभियान सुरु करेल असे राज ठाकरे म्हणाले होते.