- प्राची सोनवणे, नवी मुंबई
राज्यातील दुष्काळाच्या भीषण समस्येने मराठवाडा, विदर्भातील अनेक कुटुंबीयांनी नवी मुंबई शहराची वाट धरली आहे. हाताला कामे मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी या कुटुंबातील व्यक्तींवर भीक मागून पोट भरण्याची वेळ आली आहे. ही स्थलांतरित कुटुंबे तुर्भे उड्डाणपूल, पामबीच मार्ग तसेच खारघर, पनवेल परिसरातील सिग्नल, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच महत्त्वाच्या बाजारपेठा या ठिकाणी भीक मागताना पहायला मिळतात. पाण्याअभावी कित्येक मैल पायपीट करावी लागत होती, शेतीवरच आमचं पोट भरत होतो मात्र शेतातली पिकं जळाल्याने नुकसान झाल्याची व्यथा नांदेड येथील मुखेड तालुक्यातून आलेल्या जाधव कुटुंबीयांनी मांडली. सकाळपासून कामाच्या शोधात बाहेर पडावं तर या नवख्या शहरात पोरं-बाळं कोणाच्या भरोसे सोडून जायची म्हणून भर उन्हात या पोरांनाही घेऊन फिरावे लागत असल्याचे दु:खही स्थलांतरित कुटुंबीयांनी मांडले. सरकारकडून काही अपेक्षाच ठेवणेच चुकीचे आहे असे वाटू लागले आहे. आम्ही शहराकडे धाव घेतली पण येथेही आम्हाला उपाशीपोटीच झोपावे लागते आहे. पुलाखाली, बसस्थानक परिसर, जिथे मोकळी जागा मिळेल तिथे आम्ही राहतो. आज इथे तर उद्या तिथे असा त्यांचा जीवनप्रवास सुरु असून जिथे जागा मिळेल तिथे रात्रीचा मुक्काम केला जातो. एसटी स्टॅण्ड परिसरातही भीक मागणारे कुटुंबीय पहायला मिळतात. शहरात आल्यानंतरही दोन वेळचा खायचा प्रश्न सुटला नसून लग्नसराई सुरु असल्याने जिथे लग्न असेल त्या ठिकाणी जाऊन उरलेले अन्न आणून मुलांचे पोट भरत असल्याची व्यथा मांडली. हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानक परिसरात उन्हातान्हात भटकून दिवसाला अवघे पन्नास शंभर रुपये मिळत असून संपूर्ण कुटुंबाची भूक भागविण्यासाठी शक्य नाही. स्थलांतरित कुटुंबीयांना सरकारने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. किमान दोन वेळचं पोट भरता येईल यासाठी जेवणाची सोय करून दिली तरी देखील मिळेल ते काम करू असेही या कुटुंबीयांनी सांगितले. सकाळी नाक्यावरही काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. (शूट आऊट/८)