मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार, हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले होते. नुकतेच सरकारने खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, काही हॉटेल बंद असल्याने व्यवस्थापनाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आणखी काही दिवस हॉटेल बंद राहिल्यास, आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी चिंता हॉटेलचे व्यवस्थापक व्यक्त करत आहेत.
चेंबूर येथेही एका हॉटेलचे मॅनेजर रमेश कांबळे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बंद असल्याने हॉटेल चालक अडचणीत आहेत. हॉटेल व्यवसायाला खीळ बसल्याने, जी बचत होती, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. काटकसरीने घरखर्च चालवतो, पण ती बचत एक दिवस संपून जाईल, त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येईल.
ते म्हणाले की, एका हॉटेलवर कमीतकमी ३० ते ४० जणांचे कुटुंब अवलंबून असते. यामध्ये हॉटेल व्यवस्थापक, आचारी, वेटर, सफाई करणारे, भाजीपाला पुरवठा करणारे यांचा समावेश असतो. मात्र, अशा स्थितीत कोणी मदतीला येत आले नाही. मला कोरोनाची लागण झाली नाही, पण भाऊ आणि वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे.
हॉटेल बंद असले, तरी वीजबिल, हॉटेलचे भाडे थकले, पाणीबिल असे अनेक प्रश्न आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हॉटेल व्यवसाय चालू करावेत, असेही ते म्हणाले.