"सीईटीसाठी वेळेचे नियोजन महत्त्वाचे"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:08 AM2019-03-03T02:08:28+5:302019-03-03T02:08:36+5:30
नियोजनात्मक अभ्यास केल्यास सीईटी परीक्षा अगदी सोपी आहे. सीईटीमध्ये कोणते प्रश्न सोडवावेत, कोणते सोडवू नयेत हे पाहणे महत्त्वाचे असते.
मुंबई : नियोजनात्मक अभ्यास केल्यास सीईटी परीक्षा अगदी सोपी आहे. सीईटीमध्ये कोणते प्रश्न सोडवावेत, कोणते सोडवू नयेत हे पाहणे महत्त्वाचे असते. परीक्षेसाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे असते, कारण परीक्षेला १०० प्रश्न असतात. या प्रश्नांना १५० मिनिटांचा वेळ असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश दूर नाही, असे प्रतिपादन आयडियल मॅनेजमेंटचे संचालक विवेक सारडा यांनी केले.
शनिवार, २ मार्च रोजी बोरीवली येथे पार पडलेल्या कार्यशाळेच्या वेळी विवेक सारडा बोलत होते. या कार्यशाळेला डॉ. हेमंत ठक्कर, स्नेहल खेडकर, नजराना शेख आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे लोकमत माध्यम प्रायोजक होते. कोहिनूरचे प्रोग्रॅम हेड प्राध्यापक संदीप सावंत म्हणाले, एमबीए कोर्स आपण का करत आहोत, कोणते इन्स्टिट्यूट निवडावे, ते निवडताना तेथील शिक्षक कसे आहेत, त्यांचे इंडस्ट्रीबरोबरचे संबंध कसे आहेत, कोणत्या प्रकारचे कोर्सेस घेतले जातात, नवीन स्किल्स येतात का, असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घोंगावत असतात. दरम्यान, कार्यशाळेत कोहिनूरचे वरिष्ठ व्यवस्थापक विष्णू चौरे यांनी बिझनेस स्कूलची निवड कशी करावी, शैक्षणिक कर्ज कसे उपलब्ध होते, प्लेसमेंटची संधी मिळवण्यासाठी काय करावे, तसेच मागील वर्षाच्या आणि चालू वर्षाच्या एमबीए प्रवेशासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. परीक्षेत यश कसे मिळवावे, अधिकाधिक गुण संपादन कसे करावे, लेखी परीक्षेत गुणांची टक्केवारी कशी वाढवावी, व्हर्बल लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह पद्धतीचे प्रश्न, त्याचबरोबर करिअर प्लानिंग, बी स्कूलची निवड यावर प्रशिक्षित मार्गदर्शकांनी प्रकाश टाकला.
>आज रविवारी (३ मार्च, २०१९) वाशी सेक्टर ९ ए, मधील दैवज्ञ भवनात सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत व्हिजन एमबीए - २०१९ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.