उपासमारीची वेळ येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:18+5:302021-04-05T04:06:18+5:30
पुन्हा लॉकडाऊन लागलाच, तर कलाकारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ येईल, कारण गेल्या वर्षापासून आधीच खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता ...
पुन्हा लॉकडाऊन लागलाच, तर कलाकारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ येईल, कारण गेल्या वर्षापासून आधीच खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता कुठे थोडीफार शूटिंग्स सुरू होत आहेत. सध्या फक्त मालिका क्षेत्राची शूटिंगच व्यवस्थित सुरू आहेत. चित्रपटांची शूटिंग्स अजूनही नीट सुरू झालेली नाहीत. चित्रपटाचे शूटिंग ३०-३५ जणांमध्ये करता येत नाही; त्याला कमीतकमी ६०-६५ लोक लागतात. त्यामुळे सध्या केवळ चित्रपटाचे काही सीन्सच शूट केले जात आहेत. चित्रपटाचे शूटिंग एकदाच केले जाते; त्यामुळे लोक कमी करून आम्हाला शूटिंग करणे शक्य नसते. अशातच लॉकडाऊन लागल्यास कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. हे जरी खरे असले, तरी दुसरीकडे कोरोनाचा संसर्गही खूप वाढला आहे. त्याबाबत सरकारमधील तज्ज्ञ, डॉक्टर्स योग्य तो निर्णय घेतीलच. निर्बंध चालतील; पण लॉकडाऊन नको असे मला वाटते.
- विजय पाटकर (अभिनेते)
----------------------------------------------
लॉकडाऊन केल्यास वाईट परिस्थिती
कोरोनाबाबतची स्थिती आपण सर्वजण अनुभवत आहोत. सगळीकडे खूप वाईट परिस्थिती असल्याचे जाणवत आहे. आमच्या बिंबिसार नगरमध्येही रोज कोरोनाबाधित व्यक्ती सापडत आहेत. आमच्या शूटिंगच्या ठिकाणीही काही लोक सापडत आहेत. माझ्या एका चित्रपटाचे शूटिंगही त्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. बाहेर जरी अशी स्थिती असली, तरी आपण सर्वांनी त्यावर मात करायची आहे. सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय पाळायलाच हवेत. पण, एकंदर स्थितीवर लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊन केल्यास आमच्या क्षेत्रात खूप वाईट परिस्थिती निर्माण होईल. सरकारने लॉकडाऊन करू नये, अशी माझी प्रांजळ विनंती आहे.
- जयवंत वाडकर, अभिनेते
(संकलन : राज चिंचणकर).