पाणी विकत घेण्याची मुंबईकरांवर वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:06 AM2021-03-25T04:06:12+5:302021-03-25T04:06:12+5:30
श्रमिक वस्त्यांच्या ताेंडचे पळाले पाणी; मानखुर्द, मंडाला, अंधेरी संघर्षनगरच्या रहिवाशांची व्यथा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिका आपल्या अर्थसंकल्पातून ...
श्रमिक वस्त्यांच्या ताेंडचे पळाले पाणी; मानखुर्द, मंडाला, अंधेरी संघर्षनगरच्या रहिवाशांची व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका आपल्या अर्थसंकल्पातून विविध प्रकल्पांवर विशेषत: पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी अजूनही मुंबईच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या वस्त्यांना विविध कारणे देत पाणी नाकारले जात आहे. अशा वस्त्यांमध्ये मुंबईला स्वच्छ ठेवणारा श्रमिक वास्तव्य करत असून, हा आकडा २० लाखांच्या आसपास आहे. या वस्त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने या वस्त्यांमध्ये मुंबईच्या अनेक भागात ३० ते ३५ लिटरच्या पाण्याच्या कॅनसाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत.
‘सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॉसी’कडून जागतिक जलदिनानिमित्त ‘मी असा भारत निर्माण करीन’चा ६वा अंक प्रकाशित करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून प्राप्त माहितीनुसार, आजही मुंबईत मानखुर्द, मंडाला, अंधेरी संघर्षनगर, कांदिवली क्रांतीनगर, बोरिवली राष्ट्रीय उद्यान आदिवासी पाडा, दहिसर गणपत पाटीलनगर, मालाड आंबेडकरनगर अशा असंघटित क्षेत्रातील वस्त्यांमध्ये नागरिकांसह रस्त्यांवर राहणाऱ्या बेघरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ३० ते ३५ लिटरच्या कॅनसाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईसारख्या प्रगत शहरात मालाड मालवणीमधील अंबोजवाडी वस्तीमध्ये १ ते २ किलोमीटरवरून सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. १९९४ सालापासून येथील वस्ती वसली आहे. मात्र आजही परिस्थिती बदलेली नाही.
* वीस लाख श्रमिकांना नाकारले पाणी
मुंबई आजही वीस लाख श्रमिकांना पाणी नाकारते आहे. आणि हेच श्रमिक मुंबईला रोज स्वच्छ करण्यासाठी काम करत आहेत. यातील बहुतांश श्रमिक रेल्वे जमिनीवर, फुटपाथवर, वनविभागाच्या जमिनीवर, मिठागराच्या जमिनीवर राहात असून, त्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
- विशाल पुष्पा पद्माकर जाधव,
कार्यकर्ते, सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॉसी
* पाच घरांच्या एका नळजोडणीसाठी ३५ हजारांचा खर्च
मालाड, मालवणी, चेंबूर, गोवंडीसह मुंबईत नळ घ्यायचा असेल तर नागरिकांना गैरप्रकारांमुळे पाच घरांच्या एका नळजोडणीला ३५ हजार रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेने याकामी सरकारी प्लंबर नेमला आणि त्याने नळजोडणीच्या ठिकाणाचा सर्व्हे करत जोडणी दिली तर साहजिकच हा खर्च ३५ हजारांहून दहा हजार रुपयांवर येईन, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
-------------------------