Join us

जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:06 AM

एपीआय वाझेंची भावनिक पोस्टलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एपीआय ...

एपीआय वाझेंची भावनिक पोस्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एपीआय सचिन वाझे यांनी आपल्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर केलेली भावनिक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्याला काही सहकाऱ्यांकडून अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे. त्यामुळे ते प्रचंड निराशेत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी नकारात्मक विचार सोडावा आणि हे स्टेटस हटवावे, अशी सूचना पोलीस आयुक्त परमबीर सिंग व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. वाझे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली. त्यामुळे होणाऱ्या टीकेमुळे आपल्यावरील आरोपाला त्यांनी व्हाॅट्सॲप स्टेटसवरून उत्तर दिले. त्यात म्हटले आहे की, ‘३ मार्च २००४ रोजी सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे. मला पुन्हा खोट्या आरोपांखाली अडकविण्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडा बदल आहे. आधी हे घडले तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होते. आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्षे शिल्लक होती. मात्र, आता माझ्याकडे नोकरीची आणि आयुष्याचीही १७ वर्षे शिल्लक नाहीत तसेच अशा पद्धतीने जगण्याचे धैर्यही नाही. मला वाटते जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे.’

...........................................