मुंबई : दोन्ही पायांनी अपंगत्व असणा-या मल्टी टँलेंटेड गायिका, कॅरम, पॉवर लिफ्टिंग, जलतरण क्रिडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगीरी करत महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिव्यांग खेळाडुचा पुरस्कार प्राप्त हरहुन्नरी, मेहनती दिव्यांग महिला भानुप्रिया यांच्यावर कोरोनामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मास्क विकण्याची वेळ आली आहे.
वडाळा येथे भानुप्रिया वास्तव्यास आहेत. जन्मानंतर त्यांना सहा महिन्यांनी पोलिओने ग्रासले. त्या दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना आहे. टेलरिंगचे काम करत असलेल्या दिव्यांग भानुप्रियाच्या व्यवसायावर कोरोनामुळे गदा आली. यावर ताराई फाऊंडेशन त्यांच्या मदतीला धावून आले आणि स्टॉल उपलब्ध करून दिला. आता त्या मास्क बनवत त्याची विक्री स्टॉलवर करत आपल्या कुटूंबाचे पोट भरत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भानूप्रिया यांचा आवाज उत्तम आहे. त्या ऑर्केस्ट्रामध्ये गातात. दिव्यांच्या जलतरण क्रिडा प्रकरात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र कोरोनामुळे त्यांच्यावर मास्क विकण्याची वेळ आली आहे.
आता प्रति महिना पाच हजार रुपये, प्रत्येक मास्कमागे दहा रुपये भानुप्रिया यांना मिळतात. मात्र एवढयाने भागत नाही. आर्थिक आणि मानसिक दृष्टया दिव्यांग खचले आहेत. रेशनची मदत पुरेशी नाही. दिव्यांगाना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. दिव्यांचा विचार तरी केला पाहिजे, असे भानुप्रिया यांचे म्हणणे आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये अनेक जणांच्या रोजगारावर गदा आली आहे. घर कसे चालवायचे हा प्रश्न आज प्रत्येकाच्या समोर आहे. दिव्यांग व्यक्तींना देखील या परिस्थितीचा फटका बसला आहे. पैशाची चणचण भासल्यामुळे शारीरिक त्रासासोबतच दिव्यांगांना मानसिक तणावाला सामोर जाव लागत आहे.