लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असल्याने, सलून चालक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. घर चालविण्यासाठी पैसे नसल्याने पत्नीचे दागिने विकण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सलून बंद असल्याने सलून चालकांचे हाल होत आहेत.
याबाबत चेंबूर येथील एका सलून चालकाने सांगितले की, चेंबूर येथील दुकानात काम करतो. त्यावरच आमच्या कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालतो, पण लॉकडाऊनमुळे दुकान बंद आहे. त्यामुळे सलून चालकांचे जगणे कठीण झाले आहे. सलून चालकांच्या प्रश्नाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. रेशनवरील धान्य कधी मिळते, तर कधी मिळत नाही. गेल्या वर्षी अनेकांनी मदत केली होती, यावेळेस कोणी मदत केली नाही.
घरखर्चासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आता पत्नीचे दागिने विकले आहेत. भाजीपाला, फळविक्री किंवा अन्य दुकाने चालू आहेत. अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरणाची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची किंवा प्रसार होण्याचा धोका आहे. मात्र, त्यांना परवानगी आहे, तर सलून चालक अपॉइंटमेंट घेऊन केस कापतात. केस कापल्यानंतर साहित्याचे, परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी आहे, परंतु तरीही आम्हाला सलून सुरू करण्यास परवानगी नाही, हे अन्यायकारक आहे. सरकारने लवकरात लवकर सलून सुरू करावे.
दुकानदाराने उधारी केली बंद
घरात होते ते पैसेही खर्च झाले, त्यामुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहोत. भाजीपाला आणि इतर साहित्यही आवश्यक आहे, त्याला पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न आहे. जास्त पैसे झाल्याने आता तर दुकानदाराने उधारीही बंद केली आहे.