दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ - संजय राऊत
By admin | Published: July 11, 2017 12:40 PM2017-07-11T12:40:35+5:302017-07-11T12:45:45+5:30
अमरनाथमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा दिल्लीच्या मजबूत आणि हिंमतबाज सरकावर हल्ला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत बोलले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - अमरनाथमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा दिल्लीच्या मजबूत आणि हिंमतबाज सरकावर हल्ला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत बोलले आहेत. काश्मीरमधील दहशतवाद्यांना 56 इंचाची छाती दाखवण्याची हीच वेळ असल्याचं सांगत संजय राऊत यांनी चर्चा न करता हल्ल्याचा बदला घेण्याची भूमिका घ्यावी असंही सांगितलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं असून भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.
आणखी वाचा
संजय राऊत बोलले आहेत की, "हल्ल्याचा फक्त ट्विटरवर निषेध करुन चालणार नाही. अमरनाथ हल्ला हा दिल्लीच्या मजबूत आणि हिंमतबाज सरकावर हल्ला आहे. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घेण्याची आमची भूमिका आहे". यावेळी बोलताना संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंनी 1996 मध्ये घेतलेल्या भुमिकेची आठवण करुन दिली. "1996 रोजी जेव्हा दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती तेव्हा बाळासाहेबांन कठोर भूमिका घेतली होती. हजसाठी मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली होती", असं संजय राऊत यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. "नोटाबंदीचा परिणाम काश्मीरमधील दहशतवाद्यांवर झाल्याचा दावा सरकारने केला होता, मात्र तसं झालेलं दिसत नाही. सर्जिकल स्ट्राईक असो वा नोटाबंदी यामुळे दहशतवाद्यांवर कोणताच परिणाम झालेला नाही", अशी टीका संजय राऊत यांनी केली.
"अमरनाथ यात्रा सुरळीत झाली पाहिजे, स्थगित होता कामा नये. सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी पुर्णपणे केंद्र सरकारची आहे", असं संजय राऊत बोलले आहे. तसंच "या देशात अमरनाथ, वैष्णोदेवी यात्रा सुरळीत पार पडणार नसेल तर 80 कोटी हिंदूंचा वाली कोण ?", असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी विचारला.
दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिला यात्रेकरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.