Join us

ड्रायव्हिंग स्कूलच्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ड्रायव्हिंग स्कूलमार्फत चालकांना गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलची चाकं सध्या थांबली आहेत. कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ड्रायव्हिंग स्कूलमार्फत चालकांना गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलची चाकं सध्या थांबली आहेत. कोरोनामुळे ठप्प असलेले आरटीओचे कामकाज त्याचप्रमाणे ग्राहकांची मंदावलेली संख्या यामुळे ड्रायव्हिंग स्कूलचालकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. यामुळे या प्रशिक्षणावर आधारित असणारे ड्रायव्हिंग प्रशिक्षक तसेच ड्रायव्हिंग स्कूल मालकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या लॉकडाऊनमध्ये अनेक निर्बंध घालण्यात आले. सकाळी सात ते अकरा या वेळेतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. या लॉकडाऊनच्या काळात आरटीओचे कामकाजदेखील ठप्प असल्याने ड्रायव्हिंग स्कूलमध्ये परवाना, आरटीओची इतर कामे त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग शिकण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मंदावली. यामुळे ड्रायव्हिंग स्कूल मालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. काही मोजके ग्राहक ड्रायव्हिंग शिकण्यासाठी या स्कूल मालकांशी संपर्क साधत आहेत. मात्र, त्यांनादेखील पोलिसांच्या नजरेआडून छुप्या पद्धतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, वाहन चालवण्यास शिकल्यानंतर त्यांचा परवाना मिळू शकत नसल्यामुळे ग्राहक आपले वाहन प्रशिक्षण लांबणीवर टाकत आहेत. शिकाऊ परवाना ऑनलाईन मिळत आहे. मात्र, तरीदेखील ग्राहकांची संख्या मंदावली आहे. यामुळे आरटीओचे कामकाज तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

मंदार शेळके (युनिव्हर्सल ड्रायव्हिंग स्कूल, गोवंडी) - आरटीओचे कामकाज ठप्प असल्याने ग्राहक गाडी शिकण्यासाठी व परवाना काढण्यासाठी येत नाहीत. यामुळे व्यवसाय मंदावला आहे, तसेच दुकानाचे शटर उघडे दिसल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. सरकारने येत्या १ जून पासून आरटीओचे कामकाज सुरू करावे. त्याचप्रमाणे वाहन प्रशिक्षणास परवानगी द्यावी.

झुबेर लाखा (आरटीओ कन्सल्टंट) - आरटीओचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे. यामुळे वाहनांच्या नोंदणीला वेग येईल. यामुळे वाहन खरेदीचे प्रमाण वाढेल. त्याचप्रमाणे परवाना काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची देखील अडचण दूर होईल. सरकारने लॉकडाऊनमधून आरटीओच्या कामांना सूट द्यावी ही विनंती.