लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : नियमित समय वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन उपस्थिती देण्याबाबत सूचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. सदर बाब अत्यंत चुकीची असून, इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. यामुळे या कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे असा आरोप महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केला आहे.
संदीप शिंदे म्हणाले की, सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात मुंबईसारख्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये एसटी कर्मचारी आपल्या जिवावर उदार होऊन रात्रंदिवस काम करीत आहेत. आत्तापर्यंत ७५०० पेक्षा जास्त कर्मचारी कोरोनाने बाधित झाले असून, जवळपास २२५ हून अधिक कर्मचारी मृत झाले आहेत. परंतु मृतांच्या सर्वच वारसांना ५० लाखांचे विमा कवच व अनुकंपातत्त्वावर अद्याप नोकरी मिळालेली नाही तसेच जे कोरोनाने बाधित आहेत त्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीही अद्याप मिळालेली नाही. वरील परिपत्रकाप्रमाणे आता तात्पुरत्या समय वेतन श्रेणीवरील व रोजंदार कर्मचाऱ्यांना वेतनही मिळणार नाही. त्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ते पुढे म्हणाले की, मागील लॉकडाऊनच्या कालावधीत देण्यात आलेल्या लॉकडाऊन उपस्थितप्रमाणे या वेळीही लॉकडाऊन, संचारबंदी कालावधीची उपस्थिती सर्वच कर्मचार्यांना देऊन वेतन अदा करण्याबाबत सुधारित परिपत्रकीय सूचना प्रसारित केल्यास कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही व त्यांच्यावर उपासमारीची वेळही येणार नाही.