रोजगार बंद; दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात लागू केलेल्या नव्या निर्बंधांमुळे सलून कामगारांवर रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. जगणे असह्य झाल्याने अनेकजण टोकाचे पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे सलूनचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या कारागिरांनी केली आहे.
सलून कारागीर रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे एक दिवस दुकान बंद राहिले तरी महिन्याचे बजेट कोलमडते. गेल्यावर्षी मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन सत्रामुळे या व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून सावरत असताना आता पुन्हा नवे निर्बंध लागू करण्यात आले. परंतु, आणखी काही दिवस दुकान बंद ठेवावे लागल्यास या क्षेत्राचा कणा मोडून पडेल. त्यामुळे रोजगार संकटात येईल, अशी भीती या कारागिरांनी व्यक्त केली.
बहुतांश सलून कामगार हे उत्तर भारतीय आहेत. अतिशय अल्पमजुरीवर ते मुंबईत काम करतात. त्यातूनही बचत करून गावी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता पैसे पाठवतात. मात्र, आता मजुरी मिळणार नसल्याने कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या पोटापाण्याचे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. या चिंतेतून अनेक कारागिरांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आणखी काही दिवस दुकाने बंद राहिल्यास आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे शासनाने आमच्या समस्या लक्षात घेऊन सलूनचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून आणि ब्युटीपार्लर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केली आहे.
.........
ग्राहकांचीही पंचाईत
सलून बंद असल्यामुळे ग्राहकांचीही पंचाईत होत आहे. असह्य उकाड्याने एकीकडे हैराण होत असताना घाम साचल्याने केसात कोंडा होणे, खाज येणे, खरुजेचा त्रास अशा समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेप्रमाणे सलूनलाही सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकान खुले ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक ग्राहक विशेषतः तरुणवर्ग करू लागला आहे.