स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:34+5:302020-12-14T04:24:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय गमावलेल्या शालेय बसेस आणि सुमारे तेरा हजार चालक, वाहक, सुपरवायझर, अटेंडंटवर ...

Time of starvation on school bus drivers | स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ

स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय गमावलेल्या शालेय बसेस आणि सुमारे तेरा हजार चालक, वाहक, सुपरवायझर, अटेंडंटवर उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान, सध्या सार्वजनिक परिवहन सेवांवर वाढत चाललेला ताण, कमी पडणारी बस वाहनांची संख्या लक्षात घेता, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत प्रवासी सेवेसाठी बेस्ट वाहतुकीत आमच्या शालेय बसेसचा समावेश करून घ्यावा, अशी मागणीही काही संघटनांनी केली होती.

याबाबत मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक म्हणाले, कोरोना महामारीमुळे शाळा बरेच महिने बंद असल्याने, आम्ही अतिशय निराशाजनक परिस्थितीला सामोरे जात आहोत. बस मालकांना जानेवारी, २०२० अखेरच्या शैक्षणिक वर्षासाठीचे होणारे परिवहन शुल्क अद्याप प्राप्त झालेले नाही. वारंवार लॉकडाऊन वाढल्याने अनेक शाळांनी आपले वर्ग ऑनलाइन सुरू केले आहेत. परिणामी, पालक बससेवा वापरत नसल्यामुळे शाळांनी बस मालकांना पैसे देण्यास नकार दिला आहे. आर्थिक आवक पूर्णत: बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यासाठी आपण काहीही करू शकत नसल्याने हजारो बस ऑपरेटर आज बेरोजगार झाले आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांनी संपूर्ण शालेय अभ्यासक्रम ऑनलाइन केल्यामुळे बस मालकांवर कर, विमा, देखभाल, इएमआय, पार्किंग शुल्क इत्यादींचा आर्थिक बोजा पडला आहे.

पर्यायी व्यवस्था

बस बंद असल्याने परराज्यातील चालक, वाहक परत आले नाही. राज्यातील चालक आणि वाहक इतर वाहने चालवून घर चालवत आहेत. शालेय मुलांची काळजी घेण्यासाठी शालेय बसमध्ये जाणाऱ्या हजारो महिला कर्मचारीही लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्या आहेत. या महिला आपल्या कुटुंबाच्या एकमेव कर्त्या असून, त्यांच्याकडे कमाईचे अन्य कोणतेही साधन नाही. अनेक जण सफाईची कामे, भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत.

लॉकडाऊनपासून गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. त्यामुळे कामगारांना पगार देता येत नाही. गाडीचे इएमआय भरता येत नाही. स्कूल मालकांवरही वाईट वेळ आली आहे. आज ज्या मालकाच्या १० बस आहेत, तो स्वतः बस चालवून घरखर्च भागवत आहे.

हर्ष कोटक, सचिव, मुंबई बस मालक संघटना

मुंबईत ४,५०० स्कूल बस आहेत, त्यासाठी ४,५०० चालक, १,००० सुपरवाझर, ३,५०० क्लीनर, ४००० लेडी अटेंडंट आहेत. लॉकडाऊनपासून बस बंद आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे, या कर्मचाऱ्यांना पगार देता येत नाही.

मुंबईत ९० टक्के स्कूलबस कर्ज काढून घेतल्या आहेत, त्यांचे हप्ते कसे भरायचे, ही चिंता आहे.

रमेश मनियन, बस मालक

बस सुरू असताना महिन्याला १५,००० रुपये मिळत होते, पण आता बस बंद आहे. वाहन चालवून ५ ते १० हजार रुपये मिळत आहेत. त्यामध्ये पत्नी दोन मुले यांचा उदरनिर्वाह करत आहे.

विक्रम यादव, बस चालक

बसमध्ये काम करत होतो, तेव्हा ८ ते १० हजार महिना मिळत होता. आता बस बंद असल्याने काम नाही. छोटे-मोठे काम करून घर चालवत आहे. कधी किराणा माल घरी पोहोचविण्याचे कधी कटर्सचे काम करतो, पण हे कामे कधी-कधी असतात.

राहुल चौघुले, बस वाहक

Web Title: Time of starvation on school bus drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.