मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या कार्यालयावर महापालिकेनेकारवाई करण्याची वेळ चुकीची आहे. मुंबईत अनेक अवैध बांधकामे आहेत. अशा कारवाईमुळे निष्कारण शंकेची पाल चुकचुकते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
कंगना रनौतवरून सुरू असलेल्या वादावर खा. पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही विधान केले अथवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही. कारण मुंबई पोलिसांची कामगिरी सर्वांनाच ठाऊक आहे.
प्रसिद्धी माध्यमांनीसुद्धा थोडे तारतम्य बाळगून, अशा गोष्टींना प्रसिद्धी दिली पाहिजे. शहाण्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. धमकीचे फोन आल्याबाबत पवार म्हणाले, मला किती धमकीचे फोन आले, त्याचे रेकॉर्ड गृहमंत्र्यांनी मला दिले आहेत. फोन कुठून आलेत त्याची माहितीही दिली.