Join us

बॉम्बे डार्इंगची जागा ताब्यात घेण्यात दिरंगाई

By admin | Published: August 19, 2015 1:22 AM

बॉम्बे डार्इंग गिरणी बंद होऊन १० वर्षांचा कालावधी लोटला तरी या गिरणीच्या जामिनीवर कामगारांसाठी घरे बांधण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

मुंबई : बॉम्बे डार्इंग गिरणी बंद होऊन १० वर्षांचा कालावधी लोटला तरी या गिरणीच्या जामिनीवर कामगारांसाठी घरे बांधण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. महापालिका आणि म्हाडाने गिरणी कामगारांची घरे उभारणीसाठी गिरणीची जमीन ताब्यात घेतली नसल्याने सुमारे साडेपाच हजार घरांचे काम रखडले आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी गिरणी कामगार संघर्ष समिती महापालिका आयुक्त आणि म्हाडा उपाध्यक्षांची भेट घेणार आहे.गिरणी कामगारांच्या घरांसाठी बॉम्बे डार्इंगची प्रभादेवी आणि नायगाव येथील युनिटची ३३ हजार ८२३ चौरस मीटर जागा नायगाव येथे देण्यात आली आहे. या जागेवर सुमारे साडे पाच हजार घरे तयार होऊ शकतात. परंतु महापालिका आणि म्हाडाने गिरणीची जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. या जमिनीवर विविध आरक्षणे लादण्यात आली असल्याचा आरोप समितीने केला आहे. जागेवरील निर्बंध उठविण्याचे काम महापालिकेच्या हाती असल्याने या प्रश्नी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याचे, समितीचे सेक्रेटरी प्रवीण घाग यांनी सांगितले. तसेच गिरण्यांच्या जमिनींवर बांधण्यात आलेल्या संक्रमण शिबिराची घरे गिरणी कामगारांनाच द्यावीत, अशीही मागणी म्हाडा उपाध्यक्षांकडे करण्यात येणार आहे.