यंदा थरांचा ‘थरथराट’ होणारच!

By admin | Published: August 10, 2015 01:46 AM2015-08-10T01:46:06+5:302015-08-10T01:46:06+5:30

न्यायालयाकडून दहीहंडीच्या उंचीसंदर्भात कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे तुमच्या क्षमतेप्रमाणे सराव करून कितीही थर लावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीचे

This time there will be 'shuddering' of the subdued! | यंदा थरांचा ‘थरथराट’ होणारच!

यंदा थरांचा ‘थरथराट’ होणारच!

Next

मुंबई : न्यायालयाकडून दहीहंडीच्या उंचीसंदर्भात कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे तुमच्या क्षमतेप्रमाणे सराव करून कितीही थर लावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी केले आहे. न्यायालयाचा कल आपल्या बाजूने असून, केवळ १२ वर्षांखालील बालगोविंदांवर बंदी आहे. याशिवाय, इतर कोणतेही निर्बंध न्यायालयाने लादले नसल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक गोविंदा पथकाने सात, आठ किंवा नऊ असे कितीही थर आपापल्या क्षमतेनुसार लावण्याचे आवाहन पडेलकर यांनी केले.
परळ येथील एम.डी. महाविद्यालयात रविवारी दहीहंडी समन्वय समितीची जाहीर सभा पार पडली. या सभेत समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, मुंबई शहर सचिव कमलेश भोईर, मुंबई उपनगर सचिव समीर सावंत उपस्थित होते. या वेळी मुंबई शहर-उपनगरातील गोविंदा पथकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि यंदाच्या उत्सवाबाबत समितीची भूमिका गोविंदा पथकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले.
शहर-उपनगरांत गोविंदा पथकांना सरावादरम्यान पोलिसांनी हटकल्यास पोलिसांकडे लेखी नोटीस मागण्याचा सल्ला समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र पांचाळ यांनी उपस्थितांना दिला. तसेच, पोलिसांनी सरावाच्या वेळी रोखल्यास गोविंदा पथकांनी त्या-त्या विभागातील समितीच्या प्रतिनिधींना कळवावे, असेही सांगितले. त्यानंतर समन्वय समितीचे प्रतिनिधी पोलीस ठाण्यात पोलिसांची भेट घेऊन संवाद साधतील, असेही पांचाळ यांनी सांगितले.

न्यायालयाने राज्य शासनाला दहीहंडी धोरण तयार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे शासकीय समिती आणि दहीहंडी समन्वय समितीने संयुक्तरीत्या तयार केलेला अंतिम मसुदा शासनाकडे सुपुर्द करून महिना उलटला तरीही काहीच झाले नाही. अधिवेशनही आता संपले आहे. त्यामुळे धोरण निश्चितीचे काय झाले, असा सवाल उपस्थित करून समितीने लवकरात लवकर धोरणनिश्चितीची मागणी केली.

निकालात तांत्रिक उणिवा
सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीबाबत दिलेल्या निकालात तांत्रिक उणिवा असल्याचे समितीचे सल्लागार अभिषेक सुर्वे यांनी सांगितले. त्यामुळे त्या उणिवांसाठी पुन्हा न्यायालयात जावे लागणार आहे. या न्यायालयीन प्रक्रियेसाठी बराच खर्च लागणार असून, त्यासाठी समितीला आर्थिक पाठबळही हवे असल्याचे सुर्वे यांनी
सांगितले.

मंडपांचा प्रश्न मार्गी लावा
दहीहंडीच्या धोरणासोबतच दुसऱ्या बाजूला मंडपांबाबत सुरू असणाऱ्या वादावर शासनाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी या समन्वय समिती आणि सभेत उपस्थित असलेल्या आयोजकांकडून करण्यात आली. दहीहंडीचा उत्सव तोडांवर येऊन ठेपला आहे. तरीही मंडपांसंबंधीच्या निर्देशांमध्ये संभ्रम असल्याने आयोजकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे या सभेत आयोजक आणि समितीने मंडपांचा प्रश्न सोडविण्याची आग्रही मागणी केली.

बंदी आलीच तर...! : कोणत्याही कारणांमुळे दहीहंडी उत्सवावर बंदी आल्यास त्या वेळी गोविंदा पथकांनी काय करायचे? त्या वेळी समितीची नेमकी काय भूमिका असेल याची मोर्चेबांधणीदेखील सुरू झाल्याचे सभेदरम्यान दिसून आले. उत्सवावर बंदी आली तर समिती गोविंदा पथकांच्या सहकार्याने आणि एकजुटीने याविरोधात उभी राहील, असा निर्धार करण्यात आला.

विभाग प्रतिनिधींशी संलग्न व्हा!
ेसमन्वय समितीची भूमिका आणि भविष्यातील वाटचालीसाठी विभागवार प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रतिनिधींतर्फे व्हॉट्स अ‍ॅपवर विशेष ग्रुपही सक्रिय आहेत. या प्रतिनिधींशी संलग्न होण्याचे आवाहन सभेदरम्यान करण्यात आले. तसेच, शहर- उपनगरांतील गोविंदा पथकांनी समन्वय समितीशी संपर्क साधून किंवा दहीकाला डॉट कॉम या संकेतस्थळाच्या साहाय्याने नोंदणीचे आवाहनही समितीने केले.
लालबाग, करीरोड, डिलाईल रोड, लोअरपरळ, वरळी, दादर - संदेश महाडिक
कुलाबा, चर्नीरोड, मरिन लाइन्स - राहुल पवार
माझगाव, भायखळा, डोंगरी, उमरखाडी - सौरभ त्रिवेदी
काळाचौकी, घोडपदेव, चिंचपोकळी, फेरबंदर
- अमित आंग्रे
शिवडी, भोईवाडा, नायगाव
- शिवाजी दरेकर
वडाळा - संदीप पाटील
धारावी, माहीम
- किरण जामखांडीकर
ताडदेव, मलबार हिल
- सिद्धेश माणगावकर

मला तुमची काळजी का वाटावी?
दहीहंडीच्या धोरणनिश्चितीबाबत राज्य शासनाने अजूनही कोणतेही पाऊल उचलत नसल्याने याचिकाकर्त्या स्वाती पाटील गोविंदा पथकांना आवाहन करणार आहेत. ‘मला तुमची काळजी का वाटावी?’ या मथळ्याखाली प्रत्येक जीव हा अनमोल आहे, त्यामुळे थरांच्या जीवघेण्या स्पर्धेत सहभागी होताना आई-वडिलांचा विचार करा, असा संदेश स्वाती पाटील देणार आहेत.
या आवाहनात उत्सवाचे बाजारीकरण आणि स्पर्धा वाढविण्यामागे आयोजक कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान आयोजक गोविंदांच्या सुरक्षेची कोणतीच जबाबदारी घेत नाहीत, असे म्हटले आहे. शिवाय, २० फुटांवर हंडी बांधून त्याच भव्यतेने आयोजक गोविंदा पथकांचे स्वागत का करत नाहीत, असा सवाल उपस्थित करून आयोजकांनी सुरू केलेल्या जीवघेण्या स्पर्धेला आळा घालण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
या दहीहंडीच्या ‘इव्हेंटीकरणा’ला उत्सवाचे रूप देण्यासाठी गोविंदा पथकांच्या सहकार्याची गरज आहे. गंभीर दुखापत झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या गोविंदाच्या आई-वडिलांच्या जागी स्वत:ला उभे करा आणि विचार करा, असेही स्वाती पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: This time there will be 'shuddering' of the subdued!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.