लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चेंबूरमधील एका महिलेला सरकारी योजनेंतर्गत मुंबई पालिकेकडून अवघ्या आठ लाखांत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत सहा लाख ८० हजारांची फसवणूक केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांची सर्व जमापुंजी दिली. इलियास अहमद संजीम अहमद ऊर्फ सल्लू असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात आरसीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
तक्रारदार गृहिणी यांना नोव्हेंबर २०२० मध्ये वाशी नाका परिसरात नवीन घराच्या शोधात असताना सल्लूने त्यांना स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याने, राज्य सरकारच्या महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत अवघ्या आठ लाख रुपयांमध्ये पालिकेकडून घर मिळवून देणार असल्याने त्यांनी विश्वास ठेवून सहा लाख ६० हजार रुपये त्याला पोहोच केले.
सल्लूने त्यांना वाशी नाका येथे एका इमारतीतील घराचे ताबापत्र देत तेथे राहायला जाण्यास सांगितले. त्यानुसार, जानेवारी २०२१ मध्ये फरजाना यांनी कुटुंबासोबत या फ्लॅटवर जात ताबा घेऊन घराचे काम करण्यास सुरुवात केली. मात्र इमारतीच्या सोसायटीने त्यांना पालिकेकडून घराबाबत कागदपत्रे मिळाली नसल्याचे सांगून घराला कुलूप लावले. सल्लूला याबाबत विचारणा केली असता त्याने थोड्या दिवसांत तुम्हाला घर मिळून जाईल, असे सांगितले.
याच दरम्यान हे घर दुसऱ्याच व्यक्तीला मिळाल्याची माहिती फरजाना यांना समजली. त्यावर न्यायालयाकडून स्टे घ्यावा लागेल असे सांगून सल्लूने त्यांच्याकडून आणखी २० हजार रुपये घेतले. पण, फरजाना यांना घराचा ताबा काही मिळाला नाही.
पैशांसाठी तगादा
यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. आरोपीने त्यांना लवकरच पैसे परत करतो, असे सांगितले. अनेकदा धनादेशही दिले मात्र ते वठले नाही. अखेर, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.