Join us

डीजेचा दणदणाट, ‘लेसर शो’मुळे बहिरेपणा, दृष्टी गमविण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 10:38 AM

नागरिकांनी  डीजे आणि लेसर लाईट असलेल्या ठिकाणी जाऊ नये, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असला तरी विसर्जनाच्या दिवशी डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सांगली जिल्ह्यात दोनजणांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू  झाल्याची घटना घडली. आवाजाच्या दणदणाटामुळे अनेकांना काही प्रमाणात बहिरेपण आल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. नाशिकमध्ये लेसर लाईटचा डोळ्यांवर परिणाम होऊन काहींना अंधुक दिसू लागले आहे, तर तीन व्यक्तींची कायमची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी  डीजे आणि लेसर लाईट असलेल्या ठिकाणी जाऊ नये, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अनेकवेळा उत्सवात नृत्य करताना कार्यकर्ते बेभान होऊन नाचत असतात. मात्र, या अशा आनंदाच्या प्रसंगी लावलेल्या डीजेच्या आवाजाचा आणि लेसर लाईटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो याची अनेकांना जाणीव नाही. ध्वनी प्रदूषण हे आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेकवेळा डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, अनेक कार्यकर्त्यांकडून डीजे लावायचा अट्टाहास केला जातो. त्यातून काही वेळा अनुचित प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. तसेच लेसर शोच्या लाईटमुळेसुद्धा अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा होत असते.

ध्वनी प्रदूषणाचा हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सततच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. रक्तदाब वाढतो वा कमी होऊ शकतो. हृदयाची धडधड मोठी वाढू शकते. याचा परिणाम हृदयावर होऊन व्हॅसोवेगल शॉकसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामध्ये माणसांना चक्कर येऊन  ते बेशुद्ध होतात. डायबेटीस  व  रक्तदाब असलेल्यांनी ध्वनी प्रदूषणापासून दूर राहिले पाहिजे.

- डॉ. अजय चौरासिया, नायर हॉस्पिटल

डीजेचा आवाज नक्कीच श्रवण क्षमतेवर परिणाम करणारा असतो. ८० ते १०० डेसिबलच्यावर आवाजामुळे कानाचे पडदे फाटू शकतात. त्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो.  चक्कर येऊ शकते. मोठ्या आवाजामुळे कानांच्या पेशींना इजा होते. सतत हा आवाज कानावर पडत राहिला तर याचे गंभीर परिणाम होतात. कानात गुणगुणल्यासारखा आवाज येत राहतो.  याला वैद्यकीय भाषेत टीनीटस असे  म्हणतात.

- डॉ. शशिकांत म्हशाळ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, कूपर हॉस्पिटल

तीव्र स्वरूपाच्या लेसर लाईटचा निश्चितच डोळ्यावर परिणाम होतो. कारण लेसर लाईट हा टार्गेटेड असतो. डोळ्यांमधील रेटिनाच्या मध्यावर हा लाईट पडला तर डोळा भाजतो. तेथे काळे डाग पडतात. नजर अंधुक होते किंवा दृष्टी जाते. तीव्र प्रकाशझोतामुळे रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात. त्याला वैद्यकीय भाषेत हेमोरेज (रक्तस्राव होतो) म्हणतात. त्यामुळेसुद्धा दृष्टीवर परिणाम होऊन अंधुक दिसू शकते.    

- डॉ. प्रीतम सामंत, हिंदुजा हॉस्पिटल