जप्त प्लास्टीक विकण्याची वेळ! बाकडे, बेंच बनविण्याची पालिकेची योजना बारगळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:40 AM2023-04-13T10:40:39+5:302023-04-13T10:40:46+5:30
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टीकवर बंदी असतानाही मुंबईत हॉटेल चालक, फेरीवाल्यांकडून सर्रास प्लास्टीक पिशव्या वापरल्या जातात.
रतींद्र नाईक
मुंबई :
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टीकवर बंदी असतानाही मुंबईत हॉटेल चालक, फेरीवाल्यांकडून सर्रास प्लास्टीक पिशव्या वापरल्या जातात. त्यावर अधूनमधून पालिकेद्वारे कारवाई केली जाते. दुकानदारांकडून जप्त केलेल्या या प्लास्टीकपासून गार्डनमधील बाकडे, कार्यालयात बसण्यासाठी बेंच व इतर उपयोगी वस्तू बनविण्याची पालिकेची योजना होती. मात्र, ही योजना बारगळल्याचे चित्र असून, जप्त केलेले प्लास्टीक लिलावाद्वारे पुन्हा बाजारात येत आहे. त्यामुळे प्लास्टीकचा हा उपद्रव केव्हा थांबणार, असा सवाल मुंबईकर करत आहेत.
मुंबई तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टीकवर बंदी असतानाही प्लास्टीकच्या पिशव्या वापरल्या जातात. प्रदूषणकारी प्लास्टीकचा वापर रोखण्यासाठी पालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, आतापर्यंत चार हजार किलोपेक्षा अधिक प्लास्टीक पालिकेने जप्त केले आहे. जप्त केलेल्या प्लास्टीकचा पालिका लिलाव करते. त्यामुळे अनेकदा हे प्लास्टीक बाजारात येते, यावर उपाय म्हणून पालिकेने हे प्लास्टीक वितळवून त्यापासून गार्डनमधील बाकडे, कार्यालयात बसण्यासाठी बेंच व इतर उपयोगी वस्तू बनविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी
झालेली नाही.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्णय
जप्त केलेल्या प्लास्टीकचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेण्याचा डिसेंबर, २०२२ मध्ये निर्णय घेण्यात आला होता.
पालिका अधिकाऱ्यांची याबाबत आधीच चर्चा झाली असून, या प्लास्टीकचा वापर विविध वस्तू बनविण्यासाठी करतानाच, या कामासाठी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या घातक
२६ जुलै, २००५ मध्ये आलेल्या महापुरात याच पिशव्यांनी मुंबई तुंबविली होती. त्यानंतर, २०१८ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांची विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
असे तयार होणार बेंच आणि बाकडे
जप्त केलेल्या प्लास्टीकवर संस्थेची मदत घेऊन प्रक्रिया केली जाणार. हे प्लास्टीक आधी वितळविले जाईल व मोल्डच्या साहाय्याने बेंच, बाकडे आणि पालिकेतील इतर उपयोगी वस्तू तयार केले जातील.
जप्त केलेल्या प्लास्टीकचा लिलाव करण्यात येतो. मात्र, प्लास्टीकचा कसा वापर करता येईल, त्यापासून कशा उपयोगी वस्तू बनविण्यात येतील, याबाबत मागेच निर्णय घेतला आहे.
- संजोग कबरे, उपायुक्त.