मुंबई : देशात लोकशाही टिकविण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केवळ लोकांना जागे करून चालणार नाही, तर यासाठी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे. देश गुुलामगिरीकडे चालला असताना आपण नुसते बघत राहणार असू तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना साद घालत नवीन राजकीय समीकरणाचे संकेत दिले.
‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ या ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांच्या वेबसाइटचे रिलाँचिंग रविवारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे कौतुक करतानाच आम्ही पहिल्यांदा जरी एका मंचावर आलो असलो, तरी आमचे वैचारिक व्यासपीठ एकच असल्याचे सांगितले. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर यांनी वैदिक विचार आणि संतांचे विचार यातील फरक सांगतानाच संतांच्या विचारांतूनच लोकशाही साधली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सचिन परब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी एकत्रित केलेल्या चळवळींचे किस्से सांगून आंबेडकर आणि ठाकरे हे नाते अनेक वर्षांपासूनचे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शिवसेना प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त सुभाष देसाई उपस्थित होते.