मुंबई : मुंबईच्या खड्ड्यांवर मलिष्काने काढलेल्या विडंबन गीतावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या असल्या, तरी खड्ड्यांनी लाज आणल्याचे आता शिवसेना नेत्यांनीही कबूल केले आहे. ‘वांद्रे येथील रस्ता पूर्णत: खड्ड्यात गेला आहे. मी जर स्थानिक नगरसेविका असते, तर तेथून बुरखा घालून फिरले असते,’ असे मत व्यक्त करीत, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी चक्क स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेला घरचा अहेर दिला आहे.मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन पालिकेने पाळले नाही, याबाबत विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत स्थायी समितीचे लक्ष वेधले. पाणी तुंबले, खड्डे पडले, तरी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. खड्ड्यांमुळे नगरसेवकांनाच जाब विचारला जात असून, अधिकारी वर्ग मात्र नामनिराळा राहत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे.वांद्रेतील मेहबूब स्टुडिओ येथील रस्ता खड्ड्यात गेल्या प्रकरणी ठेकेदाराला एक लाखांचा दंड आकारण्यात आला. याबाबत बोलताना राऊत यांनी, खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावरून जाताना नगरसेवकांवर बुरखा घालून जाण्याची वेळ आल्याची कबुली दिली. त्या म्हणाल्या, ‘मी त्या विभागाची नगरसेविका असते, तर बुरखाच घालून गेले असते.’ त्यांच्या या कबुलीमुळे सत्ताधारी शिवसेना मात्र अडचणीत येण्याची शक्यता आहे.
खड्ड्यांमुळे बुरख्यातून फिरण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 2:18 AM