बेस्ट कामगार नेत्यांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 06:03 AM2019-08-28T06:03:31+5:302019-08-28T06:05:33+5:30

दोन दिवसांत करार न झाल्यास संप अटळ असल्याचा कामगार नेत्यांचा इशारा

Timeless fasting of the best labor leaders before strike | बेस्ट कामगार नेत्यांचे बेमुदत उपोषण

बेस्ट कामगार नेत्यांचे बेमुदत उपोषण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवीन वेतन करार करणे व अन्य मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीला प्रशासनाने मंगळवारी चर्चेस बोलाविले. परंतु या वाटाघाटीही फिस्कटल्यामुळे रात्रीपासून वडाळा बस आगार येथे कामगार नेत्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. वेतन करार रखडण्यास शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप कृती समितीकडून सुरू असताना येत्या दोन दिवसांमध्ये करार होईल, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. मात्र दोन दिवसांत करार न झाल्यास संप अटळ असल्याचा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी दिला आहे.


जानेवारी महिन्यात झालेला नऊ दिवसांचा बेस्ट कामगारांचा संप यशस्वी ठरला. मात्र आठ महिन्यांनंतरही अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी दिला होता. मात्र आतापर्यंत तीन वेळा संपाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत करार न झाल्यास संप अटळ असल्याचे संकेत कृती समितीने दिले होते. त्यानुसार वडाळा बस आगारामध्ये गेले दोन दिवस धरणे आंदोलन सुरू आहे.


दरम्यान, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी आपल्या दालनात संध्याकाळी पाच वाजता कामगार नेत्यांना वाटाघाटीसाठी बोलाविले होते. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे कामगार नेते शशांक राव यांनी वडाळा येथील बस आगारात रात्री आठ वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यात, महापालिकेत आणि बेस्ट उपक्रमातही सत्तेवर असताना बेस्ट कामगारांचा वेतन करार करण्यात शिवसेना अपयशी ठरली असल्याचा टोला कृती समितीने लगावला आहे.

वेतन कराराचे राजकारण पेटणार
बेस्ट कामगारांचा वेतन करार दोन दिवसांत होईल, असे शिवसेनेने जाहीर केल्यामुळे कृती समितीने मंगळवारपर्यंत प्रशासनाला करार करण्याची मुदत दिली होती. परंतु मंगळवारपर्यंत कोणताच निर्णय झाला नाही. यामुळे कृती समितीने आता शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. सेनेची सत्ता कामगारांच्या काय कामाची? राज्यात, महापालिकेत आणि बेस्ट उपक्रमातही शिवसेनेची सत्ता असताना बेस्ट कामगारांचा वेतन करार होत नाही. शिवसेनेला बेस्ट कामगार जगवायचा नाही, हेच खरे, असे फलक लावून व असा संदेश सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात येत आहे.

कामगारांच्या मागण्या
सातवा वेतन आयोग लागू करणे, बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण, दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान.
शिवसेनेची खेळी
जानेवारी महिन्यात झालेला बेस्ट कामगारांचा संप शिवसेनेने माघार घेतल्यानंतरही यशस्वी ठरला. त्यामुळे कामगार नेते शशांक राव यांना सर्व श्रेय मिळाले होते, तर शिवसेनेची नाचक्की झाली होती. या वेळेस यशस्वी मध्यस्थी केल्यास शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेला पुन्हा आपली प्रतिष्ठा मिळविता येणार आहे. पालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यात बैठक झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वेतन कराराबाबत अंतिम निर्णय जाहीर करतील, असा संदेश सर्वत्र पाठविण्यात येत आहे.

Web Title: Timeless fasting of the best labor leaders before strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.