लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धकाधकीच्या वेळापत्रकात, बदललेल्या जीवनशैलीत प्रत्येकाचीच दिनचर्या बदललेली आहे. आहार आणि जीवनशैलीचा समतोल राखण्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. याबाबतीत जागतिक हृदय आरोग्य दिनानिमित्त डॉ. नारायण गडकर यांच्याशी साधलेला संवाद...
हृदयरोगाचे प्रमाण काय आहे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हृदयरोग (सीव्हीडी) जागतिक पातळीवर मृत्यूचे प्रमुख कारण ठरले आहे. २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार अंदाजे १७.९ दशलक्ष लोक सीव्हीडीमुळे मरण पावले, जे सर्व जागतिक मृत्यूंपैकी ३२ टक्के मृत्यू हे हृदयरोगामुळे होतात. या मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू हे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होतात. अशा प्रकारे वेळीच हृदयरोगाचे निदान करणे आवश्यक आहे, जेणेकरून समुपदेशन आणि औषधांसह या आजाराचे व्यवस्थापन करता येऊ शकते.
डिजिटल माध्यमातून हृदयरोगाची जागरूकता, प्रतिबंध आणि व्यवस्थापनात कशी मदत होते?
जागतिक हृदय आरोग्य दिनानिमित्त डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हृदयरोगाविषयी जागरूकता, प्रतिबंध आणि व्यवस्थापनात कसा फायदा होत आहे. हेल्थकेअर क्षेत्र विकसित होत आहे आणि कार्डियाक केअरमध्ये अनेक नवकल्पनादेखील आल्या आहेत. डिजिटल माध्यातून हृदयरोगाविषयी जागरूकता निर्माण करणे शक्य होते या आजाराला प्रतिबंध करता येऊ शकते आणि सीव्हीडीच्या व्यवस्थापनात हे फायदेशीर ठरत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शोध सीव्हीडी असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरला आहे.
कोणत्या कारणांमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो?
खाण्याच्या चुकीच्या सवयी, आहारात जास्त मीठ, व्यायाम न करणे आणि तंबाखू आणि अल्कोहोलचे अतिसेवन केल्याने हृदयाच्या काही समस्या उद्भवू शकतात तर जन्मजात हृदयरोग निर्माण होऊ शकताे. अशाप्रकारे लक्षणे जाणवल्यानंतर हृदयविकाराचा धोका संभवू शकतो, त्यामुळे त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत. मात्र योग्य आहार-विहार, विचार, व्यायाम, नियमित तपासणी, चाचण्या, उपलब्ध उपचार या सर्व गोष्टी हृदयघात टाळू शकतात. जन्मजात हृदयरोग जे जन्मदोष आहेत जे हृदयाच्या संरचनेच्या विकृतीमुळे हृदयाचा सामान्य विकास आणि कार्यावर परिणाम करतात.
हृदयाची काळजी घेण्यासाठी काय करू शकता?
कोलेस्टेरॉलची पातळी तपासा, कोलेस्टेरॉलच्या पातळीवर नियमितपणे लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका. वेळापत्रक दैनंदिन कामाचे वेळापत्रक आखावे लागेल. पुरेशी झोप आणि दररोज व्यायाम करण्यास विसरू नका. हृदयविकाराचा त्रास असल्यास स्वतःच्या मर्जीने कसलेही व्यायाम प्रकार करू नका. शरीरातील रक्ताभिसरण वाढण्याकरिता घरातील मोकळ्या जागेत चालण्याचा व्यायाम करा. बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. कार्बोनेटेड तसेच शर्करायुक्त पेय पिण्याचे टाळा. धूम्रपान किंवा मद्यपान करू नका. पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. औषधे घेण्यास टाळाटाळ करू नका. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार करू नका. व्हिडिओ कॉल किंवा टेलिफोनच्या माध्यमातून आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. दम लागणे, छातीत धडधडणे किंवा दुखणे अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घेण्यास अजिबात संकोच करू नका.