वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:20+5:302021-07-10T04:06:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्प असे जलसंपदा विभागाने हाती घेतलेले महत्वपूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविणे, वैनगंगा-नळगंगा प्रकल्प असे जलसंपदा विभागाने हाती घेतलेले महत्वपूर्ण प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विभागाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पासंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंतरराज्य स्तरावर काही अडीअडचणी येत असतील तर संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन. तसेच वन विभागासंदर्भातील अडचणींबाबत योग्य सर्वेक्षण करावे. योजनांना अधिक गतिमान करण्याकडे विभागाने लक्ष द्यावे, जेणेकरून प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन त्याचा लाभ होऊ शकेल. राज्याचे सिंचन क्षेत्र वाढेल.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विभागामार्फत होत असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. येत्या दोन वर्षांत महत्त्वपूर्ण असे १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचे विभागाचे नियोजन आहे, असे सांगितले. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी या अंतर्गत येणारे प्रकल्प हे स्वतंत्र प्रकल्प म्हणून न समजता तूट भरून काढणारे प्रकल्प समजावेत. जलपरिषदेची बैठक घेऊन त्याद्वारे प्रकल्पांना चालना द्यावी, असे सांगितले. कोकणातील जे प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्याचाही प्राधान्याने विचार करावा. त्यासंदर्भात काही अडीअडचणी असतील तर त्या विभागाने दूर कराव्यात. कोकणातील लोकांची गरज पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पाणी पुढे वापरावे अशा सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तर विदर्भाचा महत्त्वाचा बॅकलॉग करून निघेल असा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. विदर्भाच्या चार जिल्ह्यांना याचा मोठा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.