मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक तांत्रिक कारणांमुळे हार्बर विस्कळीत होत असतानाच हार्बरचा गुरुवारी मोठा बोऱ्या वाजला. एका मालगाडीचे इंजिन पहाटेच्या सुमारास कुर्लाजवळ रुळावरून घसरले. यामुळे हार्बर दोन तास विस्कळीत झाली. त्याचा परिणाम सकाळी गर्दीच्या वेळेसही झाल्याने दिवसभरात हार्बरवरील ४0 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर ६0 फेऱ्यांना लेटमार्क लागला. पहाटे ३.५0च्या सुमारास हार्बरच्या कुर्ला येथील क्रॉस ओव्हरच्या ठिकाणी मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले. ही घटना घडताच हार्बरवरील अप आणि डाऊन हे दोन्ही मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाले. त्यामुळे दोन्ही मार्गांवरून लोकल फेऱ्यांची वाहतूक करणे कठीण होऊन बसले. घटनेची माहिती मिळताच तत्काळ इंजिन रुळावर आणण्याचे काम सुरूकेले. काम पूर्ण होण्यास सकाळचे ५.४0 उजाडले आणि त्यानंतर रूळ सुरक्षित असल्याचे सांगत ५.५0च्या सुमारास लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. तब्बल दोन तास लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी लागल्याने हार्बरचा पूर्णत: बोऱ्या वाजला. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावू लागल्या. त्यामुळे डॉकयार्ड रोड, रे रोड, कुर्ला, जीटीबी, टिळकनगर, चेंबूर, गोवंडी, वाशी यांसह अन्य काही स्थानकांवर प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागला. या घटनेमुळे हार्बरचा दिवसभरात ८0 टक्के एवढा वक्तशीरपणा राहिला. बुधवारी हाच वक्तशीरपणा ९४ टक्के एवढा होता. (प्रतिनिधी)
वक्तशीरपणाची गाडी ‘रुळावरून घसरली’
By admin | Published: November 18, 2016 6:31 AM