पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला

By admin | Published: September 27, 2016 04:14 AM2016-09-27T04:14:16+5:302016-09-27T04:14:16+5:30

अनेक छोट्या-छोट्या कारणांसाठी लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या डब्यातील आपत्कालीन साखळी खेचण्याच्या घटना घडत असून, त्याचा परिणाम ट्रेनच्या वक्तशीरपणावर होत आहे.

The timetable of the Western Railway has deteriorated | पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला

पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला

Next

मुंबई : अनेक छोट्या-छोट्या कारणांसाठी लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या डब्यातील आपत्कालीन साखळी खेचण्याच्या घटना घडत असून, त्याचा परिणाम ट्रेनच्या वक्तशीरपणावर होत आहे. साखळी खेचण्याच्या गेल्या आठ महिन्यांत तब्बल ६१३ केसेसची नोंद रेल्वे सुरक्षा दलाकडे झाली आहे. त्यामुळे वक्तशीरपणा बिघडल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून
देण्यात आली. आपत्कालीन काळासाठी त्याचा वापर करण्याऐवजी अन्य कारणांसाठी साखळी खेचण्यात येत असल्याने रेल्वेला त्याची डोकेदुखी ठरत
आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावर दिवसाला जवळपास १,३00 लोकल फेऱ्या धावतात आणि या फेऱ्यांमधून ३८ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. तर ४0पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या ट्रेन धावतात. लोकलमधून सकाळी आणि संध्याकाळी अशा गर्दीच्या वेळेत प्रवास करताना तर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातही प्रवास करताना अनेकदा काही प्रवासी छोट्या-छोट्या कारणांसाठी लोकल डब्यातील आपत्कालीन काळासाठी असणारी साखळी खेचतात.
हाच प्रकार मुंबईत आलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या ट्रेनमध्येही घडतो. त्याचा फटका बसत असल्याने ट्रेनचा वक्तशीरपणाच बिघडत असल्याचे समोर आले आहे. त्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमुळे २0१५मध्ये आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या ७३१ केसेसची नोंद झाली आहे.
त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३ लाख १५ हजार १६५ रुपये एवढा दंड वसूल केला आहे. २0१६मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत ६१३ केसेसची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.
यात दोषी प्रवाशांकडून २ लाख ४७ हजार ३५0 रुपये दंड वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक घटना या बोरीवली, अंधेरी आणि मीरा रोड स्थानकात घडल्या आहेत. (प्रतिनिधी)

कारणे काय ?
प्रवासी स्थानकात उतरण्यास विसरल्याने, टाइमपाससाठी साखळी खेचणे, दोन स्थानकांच्या दरम्यान साखळी खेचून ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणे, स्थानक आल्यास प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ आणण्यासाठी उतरणे इत्यादी कारणांसाठी डब्यातील साखळी खेचली जात आहे.

बोरीवली स्थानकात
सर्वाधिक घटना
बोरीवली स्थानकात साखळी खेचण्याच्या घटनांनी कहर केला असून, त्यामुळे लोकलचा थांबा वाढवण्याची मागणी रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

अ‍ॅपद्वारे तैनात आरपीएफची माहिती समजणार
आरपीएफ जवान नेमका कुठे तैनात आहे, किती वाजता संबंधित ठिकाणी पोहोचला इत्यादी तंतोतंत माहिती एका अ‍ॅपद्वारे पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाला मिळणार आहे. यासाठी ‘मुंबई सेंट्रल लोकल’ नावाचे अ‍ॅप खासगी कंपनीमार्फत विकसित करण्यात आले आहे. यातून आरपीएफ जवानाच्या ड्युटीची कामगिरी समोर येण्यास मदत मिळेल; तसेच गस्ती वाढविण्यास व अधिक सतर्क राहण्यासही बरीच मदत मिळणार असल्याचे पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले. यासाठी आधी अ‍ॅप डाऊनलोड करतानाच युजर आयडी पासवर्ड घ्यावा लागेल. सध्या लांब पल्ल्याच्या सहा ट्रेनमध्ये हा प्रयोग केला जाणार असून, प्रथम अवंतिका, सौराष्ट्र आणि वडोदरा एक्स्प्रेसमध्ये त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

प्रवासी सुरक्षेसाठी आणखी तीन पोलीस स्थानके
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने आणखी तीन नवी पोलीस ठाणी सुरू केली आहेत. मुंबई सेंट्रल, मालाड आणि नालासोपारा स्थानकांत पोलीस ठाणे सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मुंबई सेंट्रल लोकलच्या अंतर्गत ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी आणि परेल, तर मालाड आरपीएफच्या अंतर्गत गोरेगाव स्थानक येईल. त्याचप्रमाणे नालासोपारा आरपीएफ हे पूर्वी विरार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत होते. ते आता नालासोपारा स्वतंत्र पोलीस ठाणे होईल. तीन नव्या पोलीस ठाण्यांमुळे प्रवाशांची तक्रारीसाठी होणारी धावपळही थांबणार आहे.

Web Title: The timetable of the Western Railway has deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.