मुंबई : रंगभूमीवर नाटक करणे ही सोपी गोष्ट नाही. इथे एकही चूक चालत नाही. नाटकातले टायमिंग नक्की केले पाहिजे; नाहीतर नाटक मूळ मार्गावरून सरकते. नाटक कधी सरकवायचे नाही. मात्र, तसे झालेच तर ते नाटक संपते; असे अनुभवी भाष्य ज्येष्ठ अभिनेते व टायमिंगचे बादशहा अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकाच्या शतकी प्रयोगाच्या निमित्ताने संवाद साधताना केले.
या नाटकाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर एन्ट्री घेतली आहे. नाटकाचा पहिला प्रयोग जसा होतो, तसाच त्याचा शंभरावा प्रयोगही झाला पाहिजे. त्यात फक्त नाटक पॉलिश होण्याचाच काय तो फरक असतो. बाकी नाटकात बदल होता कामा नयेत. नाटक हे एका सुरातच व्हायला हवे. प्रत्येक कलावंताने समोरच्या कलावंतांशी सूर जुळवून घेणे आवश्यक असते.आर्टिस्ट नशीबवान असेल, तरच असे नाटक मिळते आणि हे नाटकही नशीबवान आहे. कारण त्याला उत्तम असे आर्टिस्ट मिळाले आहेत, असे मनोगतही अशोक सराफ यांनी या निमित्ताने बोलताना मांडले.प्रेक्षक आले, तर नाटक चालणार आणि चांगले नाटक दिले, तरच प्रेक्षक येणार. नाटकाची पात्र योजनाही अचूक असायला हवी. वयाच्या ७२व्या वर्षीही अशोक सराफ हे ज्या तडफेने रंगभूमीवर काम करतात, त्याला सलामच करावासा वाटतो. अशा मनस्वी कलावंतासोबत मी यात काम करत आहे, याचा मला विशेष आनंद आहे.- निर्मिती सावंत, ज्येष्ठ अभिनेत्री