टिप्स आणि ट्रिक्स - येतोय पावसाळा... आरोग्य सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 01:33 PM2023-05-29T13:33:41+5:302023-05-29T13:34:07+5:30

मे महिना संपत आला आहे. जून महिना उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. आता पावसाची चाहूल लागली आहे.  

Tips and Tricks Monsoon is coming Take care of your health know do to follow tips | टिप्स आणि ट्रिक्स - येतोय पावसाळा... आरोग्य सांभाळा

टिप्स आणि ट्रिक्स - येतोय पावसाळा... आरोग्य सांभाळा

googlenewsNext

शीतल नागरे
आहार तज्ज्ञ, 
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

मे महिना संपत आला आहे. जून महिना उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. आता पावसाची चाहूल लागली आहे.  पहिला आल्हाददायी पाऊस मनाला हर्ष देऊन जातो. झाडीझुडपे धुवून निघतात. उन्हाळ्यात वातावरणात असलेली धूळ आता खाली बसू लागते. मन उल्हासित होते व थंड झालेल्या वातावरणात मस्त गरम भजी,  आल्याचा चहा, अहाहा मस्त! गरम वातावरणाकडून थंड वातावरणाकडे जात असताना, शरीर गरम ठेवण्यासाठी सतत खाण्याची इच्छा होते. परंतु, पावसाळ्यात  बॅक्टेरिया, व्हायरसेस यांचा प्रादुर्भाव वाढतो. दूषित पाण्यामुळे त्यापासून होणारे आजार वाढतात, म्हणून खानपानाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  पाणी उकळून प्यावे म्हणजे पोटाचे विकार टाळण्यासाठी मदत होईल. पावसाळ्यात कोमट पाणी पिल्याने पोटात वात भरणार नाही, टाॅक्झिन्स शरीराबाहेर टाकण्यास मदत होईल,  मलावरोधाचा त्रास कमी होईल.  अर्थातच शरीर निरोगी राहण्यासाठी उपयोगी ठरेल. 
  पावसाळ्यात भाज्यांचे सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दूषित पाण्यामुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो म्हणून बाजारातून भाज्या घरी आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून मगच वापराव्यात. शक्यतो कच्च्या भाज्या खाणे टाळल्यास पोटाचे विकार उद्भवणार नाहीत. भाज्यांचे सूप मधल्या वेळेत घ्यावे. जेणेकरून रोगप्रतिकारक फायदा मिळेल व शरीराला पोषकतत्त्व मिळतील. 
  फळे ही स्वच्छ धुवून मगच सेवन करावी. जेणेकरून पोटाचे आरोग्य सांभाळता येईल. पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फळे खाणे आवश्यक आहे. 
  एकदम भरपेट न खाता थोड्या थोड्या वेळाने खाणे योग्य, जेणेकरून पोटाची पचनशक्ती चांगली राहील. 
  आहार ताजा व गरम घेतल्यास पोटाचे विकार टाळता येतील.
  पावसाळ्यात बॅक्टेरिया व विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. टॉयलेट स्वच्छ ठेवावे, टॉयलेटचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवावे,  प्रत्येकवेळी आहार घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे,  भांडी धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. रोड साइड फूड खाणे टाळावे,  अन्न उघडे ठेवणे किंवा त्याचे सेवन टाळावे. रोड साईड फ्रूट चाट खाणे टाळावे. रोड साईड लिंबू पाणी सेवन करणे टाळावे. ० ते ६ महिने वयोगटातील मुलांना फक्त आईचे दूध दिल्यास जंतूसंसर्ग टाळता येईल तसेच बाळाचे डायपर बदलल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. लहान मुलांना खेळून झाल्यानंतर किंवा मातीत हात घातल्यानंतर स्वच्छ हात धुण्याची सवय लावल्यास कृमी व जंतूसंसर्ग टाळता येईल.

  मुलांना कृमीनाशक औषध दर सहा महिन्यांनी दिल्यास त्यांच्यातील कुपोषण व रक्तक्षय टाळता येईल. मुलांना  घरी बनविलेले लिंबू पाणी,  ताक, हिंग,  आले ह्याचा आहारात वापर केल्यास कृमीनाशकाचे काम करेल व पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासह आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होईल.  
  रोगप्रतिकारक आहार जसे की, व्हिटॅमिन सी युक्त आहार, रंगीत नैसर्गिक आहार उदा. रंगीत फळे व भाज्या, आले,  लसूण, हळदयुक्त आहार, अंडी यांचे सेवन करावे. 
  अति तिखट, अति प्रथिनयुक्त,  मसालेदार, तिखट पदार्थ टाळल्यास ॲसिडिटीचा त्रास,  गॅस होणे,  ब्लोटिंगचा त्रास टाळता येईल. 
  घरातील जमा होणाऱ्या पाण्याचा व्यवस्थित निचरा केल्यास माशा व मच्छरांचा प्रादुर्भाव टाळता येईल व त्यापासून उद्भवणाऱ्या आजारांपासून रक्षण होईल. 
  तसेच जीवनशैली  सक्रिय ठेवल्यास, व्यायाम नियमित केल्यास व आहाराची काळजी घेतली तर पावसाळ्याचा आनंद छान घेता येईल.

Web Title: Tips and Tricks Monsoon is coming Take care of your health know do to follow tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.