मुंबई – शहरातील मालाड येथे क्रिडांगणाला दिलेल्या टिपू सुलतान नावामुळे सध्या मोठा वाद रंगला आहे. भाजपाने टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध केल्यानं महाविकास आघाडीचे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक झाले. त्यातच भाजपानेही टिपू सुलतान यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं जुनं पत्र व्हायरल होत आहे. त्या पत्राविरोधात आता आमदार अमित साटम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत महापौर किशोरी पेडणेकर, पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
अमित साटम यांनी पत्रात म्हटलंय की, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री अस्लम शेख यांच्याकडून एक पत्र व्हायरल केले जात आहे. ज्यामध्ये २७ डिसेंबर २०१३ रोजी महापालिकेच्या सभेत एका रस्त्याला टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या प्रस्तावाला मी अनुमोदन दिले होते. परंतु असा कुठलाही फॉर्मेट मुंबई महापालिकेचा नाही. व्हायरल झालेले पत्र हे नव्याने तयार करण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र पूर्णपणे खोटे व नव्याने तयार केलेले आहे. त्यामुळे याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मंत्री अस्लम शेख आणि मुंबई महापालिकेचे चिटणीस यांच्याविरोधात ४२०, ४९९, ५०० च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील मालाड येथील क्रिडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपानं आक्षेप घेतला आहे. तर मागे गोवंडी येथील रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्याच्या प्रस्तावाला भाजपानेच अनुमोदन दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपानं आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर टिपू सुलतान नावावरून भाजपा धार्मिक रंग देऊन राज्यातील वातावरण बिघडवू पाहत आहे. पाकिस्तान, मंदिर, मशिद, धर्म संसदेच्या माध्यमातून धार्मिक मुद्दे चर्चेत आणून भाजपा राजकारण करत आहे. मुंबईत टिपू सुलतानच्या विषयावरून वातावरण पेटवून त्याचा निवडणुकीत फायदा उचलण्याचे हे षडयंत्र आहे. परंतु भाजपाने धार्मिक मुद्दे सोडून निवडणुका लढवून दाखवाव्या असं आव्हान काँग्रेसनं दिलं आहे.