मुंबई : स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या तीराच्या आई-वडिलांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या आजारावर लागणारे इंजेक्शन अमेरिकेतून भारतात मागवण्यासाठी जे सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्युटी भरावी लागणार होती. ती माफ व्हावी यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कामत कुटुंबीयांना पत्र दिले आहे. हे औषध भारतात येण्यासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने उचललेले हे पाऊल नक्कीच सकारात्मक आहे. त्यामुळे तीराच्या आई-वडिलांवर असलेल्या जवळपास पाच कोटी रुपये जमा करण्याचा ताण हलका होणार आहे.
पाच महिन्यांच्या चिमुकल्या तीरावर सध्या तिच्या अंधेरीतील घरी पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. तीराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान, चिमुकलीच्या रक्ताचा एक अहवाल येणे अद्याप बाकी आहे. तो अहवाल आल्यानंतर तीराला औषध मिळणे शक्य होणार आहे.
आई वडिलांचे शर्थीचे प्रयत्न
स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी हा दुर्धर आजार आहे. तीरा कामत या चिमुकलीला हा आजार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्या लेकीला वाचवायचे आहे. तिला हे जग दाखवायचे आहे, असा मनाशी निश्चय करून तीराच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडला. त्यासाठी कामत कुटुंबीयांना अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी मदत केली. त्यातून तब्बल १६ कोटी रुपयांची रक्कमही उभी केली. पण एक वेगळीच अडचण या कुटुंबीयांसमोर उभी राहिली होती. कारण, अमेरिकेतून हे औषध भारतात आणण्यासाठी कस्टम ड्युटी अर्थात सीमा शुल्क लागणार आहे. त्यासाठी थोडेथोडके नाही तर २ ते ५ कोटी रुपये लागणार होते. त्यामुळे कामत कुटुंबाने हे सीमा शुल्क माफ करण्याची विनंती राज्य आणि केंद्र सरकारला केली होती. अखेर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने त्या चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलो आहे. त्याबाबतचे एक पत्र आरोग्य विभागाने कामत कुटुंबाला सोमवारी पाठवले आहे. आता हे पत्र कामत कुटुंब संबंधित औषध कंपनीला पाठवणार आहे. या पत्राच्या आधारे तीराच्या औषधावरील कर माफ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कामत कुटुंबाला राज्य सरकारच्या या पत्राद्वारे मोठा दिलासा मिळाला आहे.