प्रजासत्ताक दिनी मुंबईत भाजपाची भव्य 'तिरंगा यात्रा', मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार 'संविधान सन्मान सभा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 02:34 PM2018-01-24T14:34:45+5:302018-01-24T14:35:12+5:30
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंबई भाजपातर्फे मुंबईत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघेल, अशी माहिती आमदार विजय (भाई) गिरकर यांनी दिली.
मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंबई भाजपातर्फे मुंबईत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघेल, अशी माहिती आमदार विजय (भाई) गिरकर यांनी दिली. तर यात्रेच्या समारोपाला होणा-या संविधान सन्मान सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत.
26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता भाजपाच्या भव्य तिरंगा यात्रेची सुरूवात होणार असून चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या तिरंगा यात्रेला सुरूवात होणार आहे. शिवाजी पार्क पासून माटुंगा, रूपारेल कॉलेज कडून ही यात्रा सेनापती बापट मार्गावरून दादर रेल्वे स्टेशन फुल मार्केटकडून पुढे एलफिस्टन रोड येथील हुतात्मा बाबू गेनू क्रिडांगण (कामगार मैदान) येथे या यात्रेचे सभेत रुपांतर होईल.
“संविधान के सन्मान में भाजपा मैदान में...” असा नारा देत भाजपाचे हजारो कार्यकर्ते, तसेच भाजपा खासदार किरिट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पुनम महाजन यांच्यासह राज्य शासनातील मंत्री विनोद तावडे, प्रकाश महेता, विद्या ठाकूर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, आमदार, नगरसेवक या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. तर कामगार मैदानात होणा-या संविधान सन्मान सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख वक्ते म्हणून संबोधित करणार आहेत, यावेळी आमदार अॅड आशिष शेलार यांचेही भाषण होईल, अशी माहिती भाजपातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात आमदार भाई गिरकर यांनी दिली आहे. ही तिरंगा यात्रा मुंबई विभागाची असून राज्यात प्रत्येक जिल्हयात ठिकठिकाणीही अशाच यात्रा काढण्यात येणार आहेत.