Join us  

थकलेली बिले लवकरच भरण्यात येणार

By admin | Published: May 23, 2014 2:27 AM

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फोर्ट येथील ‘बांधकाम भवन’ची सुमारे २० लाखांची थकलेली बिले लवकरच भरण्याचा निर्णय मध्य उपविभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. एस. चव्हाण यांनी घेतला आहे.

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फोर्ट येथील ‘बांधकाम भवन’ची सुमारे २० लाखांची थकलेली बिले लवकरच भरण्याचा निर्णय मध्य उपविभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. एस. चव्हाण यांनी घेतला आहे. गुरुवारी ‘लोकमत’ने थकलेल्या बिलांचे वृत्त प्रसिद्ध करून प्रकाश म्हात्रे या स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यकाची व्यथा मांडली होती. त्याची दखल घेत गुरुवारी प्रशासनाने सहकुटुंब उपोषणास बसलेल्या म्हात्रे यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. तसेच थकलेली सर्व बिले लवकरच चुकती करण्याचे आश्वासन दिले आहे. याआधी बांधकाम भवनमधील वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठेकेदारांमार्फत पुरवण्यात येणार्‍या खाण्यापिण्याच्या वस्तूंसह कार्यालयीन कार्यक्रमांसाठी लागणार्‍या वस्तूंची दोन वर्षांची बिले थकवली होती. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांनी थकवलेल्या बिलांमुळे ठेकेदार आणि प्रशासनात समन्वयकाची भूमिका बजावणारे स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक प्रकाश म्हात्रे गोत्यात आले होते. वरिष्ठांनी बिले मंजूर केली असून म्हात्रे आपल्याला ती रक्कम देत नसल्याचा ठेकेदारांचा गैरसमज झाला होता. परिणामी काही ठेकेदारांकडून म्हात्रे यांच्यावर दबाव येत होता. त्यामुळे म्हात्रे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. मात्र वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडत असल्याचे म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिवाय याआधीही लेखी आश्वासन देऊन त्याची पूर्तता न करणार्‍या वरिष्ठांसमोर शुक्रवारी ठेकेदारांना घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून आपण कोणाचेही पैसे गिळंकृत केले नसल्याबद्दल त्यांचा विश्वास पटेल, असेही म्हात्रे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)