काँग्रेसचा आरोप : भाजपच्या भूमिकेच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी भाजपच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. राज्य सरकारने त्याची सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे बुधवारी केली आहे. तर याबाबत भाजपच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचे आश्वासन देशमुख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला ऑनलाइन बैठकीत दिले.
दोन दिवसांपूर्वी डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलात आत्महत्या केली. डेलकर यांनी गेल्या दीड वर्षांपासून आपल्यावरील मोठ्या दबावाची आणि छळवणुकीबद्दलची व्यथा स्वतःच व्हिडिओद्वारे, तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा म्हणून त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली असावी, असे सांगून सावंत म्हणाले की, नोकरशाही, पोलीस, तपास यंत्रणा आणि स्थानिक गुंडांकडूनही होणाऱ्या छळवणुकीबाबत त्यांनी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली होती. ते लोकसभेमध्ये राजीनामा देऊन आपली व्यथा मांडणार होते. संसदेत मागच्या अधिवेशनात त्यांनी आपली व्यथा मांडली होती. तसेच त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रफुल्ल पटेल यांचे नाव आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. पटेल हे भाजपचे मोठे नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली. काँग्रेसच्या शिष्टमंडळात काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, सोशल मीडिया विभागाचे विनय खामकर हेही सहभागी होते.