Join us

थकून गेले शरीर तरीही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:06 AM

पोलीस, बेस्ट, एसटी विभागातील काेराेना याेद्ध्यांनी बजावले कर्तव्य; प्रशासनाकडून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत जाहीरसुहास शेलारलोकमत न्यूज नेटवर्क...

पोलीस, बेस्ट, एसटी विभागातील काेराेना याेद्ध्यांनी बजावले कर्तव्य; प्रशासनाकडून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत जाहीर

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : संपूर्ण मुंबईला कोरोनाचा घट्ट विळखा बसला असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अखंड सेवा दिली. पण कर्तव्य बजावताना त्यापैकी काहींना या विषाणूची बाधा झाली. काही योद्ध्यांचा कोरोनाने बळीही घेतला. पोलीस दल, बेस्ट आणि एसटी विभागाने आपल्या सेवेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात किती जणांपर्यंत मदत पोहोचली, हे जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने केलेला प्रयत्न...

लॉकडाऊनच्या काळात रोजगार गेल्याने पायी गावी निघालेल्या मजुरांच्या सेवेसाठी परिवहन विभागाने विशेष गाड्यांचे नियोजन केले. त्याप्रमाणे मुंबई आणि परिसरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठीही एसटी सोडण्यात आल्या. यादरम्यानच्या काळात सेवा बजावताना ४७४० एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ११४ जण मृत्युमुखी पडले. यापैकी ११ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली. तर ११४ मृतांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार असून, कोरोनाबाधितांनाही उपचार खर्च मिळणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माणसांच्या संचारावर निर्बंध आणण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. जिल्ह्याच्या सीमा किंवा रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्याची चौकशी करावी लागत असल्याने कोरोनाची बाधा होण्याची सर्वाधिक शक्यता असतानाही पोलीस कर्मचाऱ्यांनी न डगमगता सेवा दिली. या काळात बरेच पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले. ९९ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने ५० लाखांची मदत जाहीर केली. मुंबई पोलीस दलाकडूनही १० लाखांच्या विम्याची रक्कम देण्यात आली. ही सर्व मदत संबंधितांना सुपूर्द करण्यात आली. त्याशिवाय मृताच्या वारसांपैकी एकाला पोलीस सेवेत घेण्यात येणार असून, संबंधित व्यक्ती सध्या प्रशिक्षण घेत असल्याची माहिती पोलीस दलाने दिली.

अत्यावश्यक सेवेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘बेस्ट’चे कर्मचारीही कोरोना संसर्गापासून वाचू शकले नाहीत. आतापर्यंत २,९४६ बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ६५ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले असून, त्यासाठी मुंबई पालिकेकडून ५० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

...............

आकडेवारीवर नजर...

विभाग.... कोरोनाबळी

पोलीस ९९

एसटी ११४

बेस्ट ६५