शाळेत जायचा कंटाळा; विद्यार्थिनीची आत्महत्या
By Admin | Published: October 26, 2016 04:28 AM2016-10-26T04:28:56+5:302016-10-26T04:28:56+5:30
शाळेत जाण्याची इच्छा नसतानाही पालकांकडून शाळेसाठी होत असलेल्या आग्रहाला कंटाळून, दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गोरेगावमध्ये घडली.
मुंबई : शाळेत जाण्याची इच्छा नसतानाही पालकांकडून शाळेसाठी होत असलेल्या आग्रहाला कंटाळून, दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना गोरेगावमध्ये घडली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत, आरे पोलीस अधिक तपास करत आहेत. नेहा बिजयकुमार यादव असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
गोरेगाव पूर्वेकडील मयुरनगर परिसरात नेहा कुटुंबीयांसोबत राहात होती. तिचे वडील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करतात, तर नेहा ही आरेतील हर्ष पब्लिक शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी संध्याकाळी तिची आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेली होती. वडील कामावर, तर लहान भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला होता. तेव्हा तिने घरात गळफास घेतला. आई घरी परतली, तेव्हा नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
गेल्या काही दिवसांपासून नेहा शाळेत जाण्यासाठी नकार देत होती. कुटुंबीयांनी मात्र शाळेत जाण्यासाठी तगादा लावला होता. यातूनचे तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती, आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ओऊळकर यांनी सांगितली. या ठिकाणी अद्याप तिने मृत्यूपूर्वी लिहिलेले पत्र पोलिसांना सापडलेले नाही, तसेच या धक्क्यातून अद्याप तिचे पालक सवरलेले नसल्याने, त्यांचे जबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळेल, असेही ओऊळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)