Join us

मरोळकरांची मेट्रो सर्वेक्षणासाठी दमछाक

By admin | Published: July 02, 2017 6:38 AM

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-३ प्रकल्पासाठी मार्गावरील जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. मरोळ येथील विलियम हाउस ही इमारत मुंबई मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)च्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-३ प्रकल्पासाठी मार्गावरील जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. मरोळ येथील विलियम हाउस ही इमारत मुंबई मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)च्या पट्ट्यात येते. विलियम हाउस या इमारतीतील रहिवासी गॉडफ्रे पिमेंटा यांनी त्यांच्या इमारतीच्या सर्वेक्षणाच्या अहवालाची प्राधिकरणाकडे मागणी केली; परंतु ही माहिती त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत त्यांच्या इमारतीच्या सर्वेक्षणाचा अहवाल मागितला. त्यानंतर पिमेंटा यांना सर्वेक्षणाचा अहवाल देण्यात आला. परंतु ‘मी ज्या इमारतीत राहतो त्याची माहिती मिळवण्यासाठी मला माहितीच्या अधिकाराचा उपयोग का करावा लागतो,’ असा सवाल पिमेंटा यांनी उपस्थित केला आहे. मेट्रोसाठी प्राधिकरणाने ज्या इमारतींचे सर्वेक्षण केले आहे, त्या सर्व इमारतींमधील रहिवाशांना त्यांच्या इमारतींचा अहवाल जर रहिवाशांनी मागितला तर तो द्यावा; अथवा सरसकट सर्व इमारतींना त्यांच्या इमारतींचा सर्वेक्षण अहवाल सुपुर्द करावा, अशी मागणी पिमेंटा यांनी केली. कोणत्याच प्रकल्पग्रस्ताला त्याच्या इमारतीचा, घराचा सर्वेक्षण अहवाल मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली मागणी करावी लागू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. नागरिकांना त्यांच्या घर-इमारतीचा अहवाल मिळविण्यासाठी १८० रुपये खर्च करावे लागत असतील तर हे दुर्दैव आहे, असेही त्यांनी सांगितले.