कारावासाला कंटाळला अन् त्यानं गुन्हा कबूल केला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 06:59 AM2022-07-10T06:59:02+5:302022-07-10T06:59:40+5:30
पोक्सो कायद्यांतर्गत करण्यात आली होती अटक
मुंबई : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला सप्टेंबर २०२० मध्ये जामीन मंजूर होऊनही तो कारागृहाबाहेर न आल्याने त्याने न्यायालयात गुन्हा कबूल केला. अडीच वर्षांहून अधिक काळ तो कारागृहात आहे आणि त्याच्यावर ज्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, त्यात त्याला जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, दिंडोशी न्यायालयाने त्याने गुन्हा मान्य असल्यासंदर्भात केलेला अर्ज स्वीकारण्यास नकार दिला.
आरोपीने स्वेच्छेने गुन्हा कबूल न करता कारागृहात प्रदीर्घ काळ राहिल्याने गुन्हा कबूल केला, असे अर्जावरून दिसते. गुन्हा मान्य करण्याचे हे कारण असू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी कादिर रमझान शेख याचा अर्ज फेटाळला. २१ डिसेंबर २०१९ रोजी एका नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा शेखवर समतानगर पोलिसांनी दाखल केला. अडीच वर्षांपासून तो कारागृहातच आहे.
शेखवर पोक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कलमांतर्गत आरोपी दोषी ठरला तर त्याला तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, ९ सप्टेंबर २०२० रोजी विशेष पोक्सो न्यायालयाने शेखची १५ हजार रुपयांच्या जामीन मंजूर करून जामिनाची रक्कम भरण्यासाठी शेखला तीन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, आर्थिक स्थितीमुळे ही रक्कम भरू शकत नसल्याने शेख जामिनावर बाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे त्याला तुरुंगातच खितपत पडावे लागले.
त्यानंतर मे २०२२ मध्ये शेखने गुन्हा कबुलीसंदर्भात तीन पत्रे विशेष न्यायालयाला पाठविली. मी गुन्हा कबूल करत आहे. जेवढे दिवस मी कारागृहात काढले आहेत, तेवढी शिक्षा पूर्ण केली असे समजून मला कारागृहाबाहेर काढावे, असे शेख याने अर्जात म्हटले आहे. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळूल लावला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला नोटीस
न्यायालयाने समतानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला नोटीस बजावली. आरोपीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश देऊनही त्या आदेशाचे पालन न केल्याने कारवाई का करण्यात येऊ नये, याचे स्पष्टीकरण न्यायालयाने समतानगर पोलिसांकडून मागितले.