मुंबई : फिरस्ते, भटके किंवा ट्रॅकर मंडळी पायाला भिंगरी लागल्यागत द-या, खो-यात भटकत असतात. नावीन्याचा शोध घेत धाडस करत डोंगर वाटा पालथ्या घालत असतात. आता कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने ही मंडळी घरातच आहे. असे असले तरी देखील आपल्याकडील ज्ञान, आपल्याकडील माहितीचा खजिना यांनी आता लोकांसाठी खुला केला आहे. यापैकीच एक असलेल्या डॉ. प्रिती पटेल यांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपल्याकडील माहिती लोकांना विषद करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातंर्गत सह्याद्रीतील घाट वाटा फिरताना त्यांना आलेले अनुभव त्या कथन करत आहेत.
प्रिती पटेल यांच्यासारख्या भटक्या व्यक्तीने सहयाद्रीचे नेमकेपण ओळखत भटकंती सुरु ठेवली आहे. प्रिती या गिर्यारोहरक आहेत. हेच करताना त्यांना सहयाद्रीतील घाट वाटाच्या भटकंतीची ओढ लागली. आणि मग सुरु झाला तो घाटवाटांच्या चढाई उतराईचा प्रवास. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. कारण घाटवाटांचा वापर होत नसल्याने साहजिकच त्या दुर्लक्षित झाल्या होत्या. त्यावर गवत उगवले होते. शिवाय याची माहिती असणारी माणसे शोधणे कठीणच. मग त्यांनी या वाटा शोधल्या. आसपासची गावे शोधली. वाटांची माहिती असलेल्या माणसांचा शोध घेतला आणि मग पुढे सुरु झाला ती भटकंती. पुढेही घाटवाटांची मोहीम सुरुच राहिली. आणि ही मोहीम सुरु असतानाच याचे अनुभव देखील प्रिती यांनी लेखनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले. साहजिकच लोकांना ते भावले. आणि त्यांची भटकंती समृद्ध होत गेली. पन्नास काय किंवा त्यापेक्षा अनेक घाट वाटांचे त्यांनी केलेले कथन लोकांना आवडले. हे करताना त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली; त्या प्रत्येकाचा उल्लेख त्यांनी आपल्या लेखनात, बोलण्यात आणि वाचनात केला.
असाच काहीसा समृध्द प्रवास प्रिती पटेल आता सोशल मीडियाच्या माध्यमांतून लोकांसमोर मांडत आहेत. लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या लोकांना घाटवाटांंची माहिती व्हावी हा त्या मागचा हेतू आहे. दरम्यान, आता २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता सहयाद्रीतल्या दुर्गम, अनवट घाटवाटा, त्यांचे प्रकार, त्यांचे व्यवस्थापन आणि भन्नाट अनुभव अशी प्रिती यांची मैफीलच सोशल मीडियावर रंगणार आहे.
लिंक : https://www.facebook.com/Travorbis