तीर्थ सिंग अरोरा अव्वल स्थानी
By admin | Published: February 13, 2017 05:31 AM2017-02-13T05:31:43+5:302017-02-13T05:31:43+5:30
दृष्टिहीन बांधवांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती जोपासण्यासाठी आयोजित केलेल्या दृष्टिहीन कार रॅली स्पर्धेत तीर्थ सिंग अरोरा याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मुंबई : दृष्टिहीन बांधवांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती जोपासण्यासाठी आयोजित केलेल्या दृष्टिहीन कार रॅली स्पर्धेत तीर्थ सिंग अरोरा याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हितेश बोरालेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर शाहबाज खानने तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते.
रविवारी सकाळी ९ वाजता वरळी, नॅशनल स्पोटर््स कल्ब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथून मोठ्या उत्साहात कार रॅली स्पर्धेला सुरुवात झाली. राऊंड टेबल आॅफ इंडियाच्या वतीने १२व्या कार रॅलीमधील अंध स्पर्धकांच्या जिद्दीचे कौतुक करण्यासाठी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या वेळी सहभागी स्पर्धकांनी ‘गो कॅशलेस’असा संदेश मुंबईकरांना दिला.
स्पर्धेत १०० कारचालकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांना सहकारी म्हणून महिला वाहनचालकांनीदेखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वरळी (एनएससीआय) - हाजी अली येथून यू टर्न घेत - वांद्रे आणि वांद्रे येथून पुन्हा एनएससीआय असा ३० किमी पल्ला स्पर्धकांना गाठायचा होता. स्पर्धेत विजेता अरोरा आणि वाहनचालक मुकुंद रंगनाथन यांना सन्मानचिन्ह देत गौरविण्यात आले. हितेशचा वाहनचालक विशाल झुनझुनवाला आणि शाहबाजचा वाहनचालक वैभव सचदेव यांना अनुक्रमे दुसरे आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. या वेळी खास ब्रेल लिपीतून तयार केलेल्या मार्गनिर्देशक नकाशा प्रत्येक स्पर्धकाला देण्यात आला होता. त्याच्या मदतीने स्पर्धकांनी चालकाला सूचना देत स्पर्धेला सुरुवात केली. संपूर्ण मार्गावर एकूण ६ चेकपोस्ट होते. कार रॅली स्पर्धेची आखणी, वळण रस्ता, मार्ग अशा नियोजनाची जबाबदारी खाजगी कार रेस आयोजकांकडे सोपविण्यात आली होती. (प्रतिनिधी)