हाती रुपया नसतानाही घडले देवदर्शन, तीर्थ दर्शन योजनेने पदरी पुण्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:28 IST2025-01-01T15:25:12+5:302025-01-01T15:28:25+5:30
या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील ६६, तर देशातील ७३ महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येईल. राज्याच्या ६६ तीर्थस्थळांमध्ये मुंबईच्या १५, तर ठाण्याच्या २ तीर्थस्थळांचा समावेश आहे. लाभार्थ्याला एका प्रमुख स्थळाच्या यात्रेचा एकदाच लाभ घेता येईल. प्रवास, भोजन आणि निवासासाठी प्रती व्यक्ती ३० हजार रुपये देण्यात येतात.

हाती रुपया नसतानाही घडले देवदर्शन, तीर्थ दर्शन योजनेने पदरी पुण्य!
मुंबई : वयाची साठी पार केल्यांनतर अनेकांना देवदर्शनाची ओढ लागते. तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे, पुरेशी माहिती नसल्याने आणि कोणी सोबत नसल्याने अनेकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या तीर्थस्थळांना मोफत प्रवास करून देणारी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू केली आहे. सर्व धर्मातील ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील ६६, तर देशातील ७३ महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येईल. राज्याच्या ६६ तीर्थस्थळांमध्ये मुंबईच्या १५, तर ठाण्याच्या २ तीर्थस्थळांचा समावेश आहे. लाभार्थ्याला एका प्रमुख स्थळाच्या यात्रेचा एकदाच लाभ घेता येईल. प्रवास, भोजन आणि निवासासाठी प्रती व्यक्ती ३० हजार रुपये देण्यात येतात.
आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला.
- वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो.
- जवळच्या नातेवाइकाचा मोबाइल क्रमांक.
- योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमधून मुंबईतील १५०, उपनगरातील २५० आणि ठाण्यातील ४०० नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर दर्शनाचा लाभ घेतला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात जे अर्ज आले त्यांची छाननी सुरू आहे. यात शिर्डी आणि पंढरपूरला नागरिकांनी प्राधान्य दिले आहे. एका टूरसाठी किमान ८०० प्रवाशी संख्या आवश्यक असते. इतके प्रवासी असल्यावरच त्यांना विशेष रेल्वेने नेता येते. मात्र, संख्येअभावी अयोध्या वगळता अजून एकही टूर नेण्यात आलेली नाही.
- प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग.
महाराष्ट्रातील प्रमुख ५ तीर्थस्थळे
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर : पुणे
- महालक्ष्मी मंदिर : कोल्हापूर
- ज्योतिबा मंदिर : कोल्हापूर
- साईबाबा मंदिर : शिर्डी, अहमदनगर
- गणपतीपुळे : रत्नागिरी
मुंबईतील प्रमुख
५ ठिकाणे
- सिद्धिविनायक मंदिर : प्रभादेवी
- चैत्यभूमी : दादर
- मुंबादेवी मंदिर : मुंबादेवी
- वाळकेश्वर मंदिर : मलबार हिल
- महालक्ष्मी मंदिर : महालक्ष्मी
कशी होते लाभार्थ्यांची निवड?
- प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड.
- कोट्यापेक्षा अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार केली जाते. प्रति लाभार्थी रु. ३० हजार कमाल मर्यादा असली तरी टूर पॅकेज जिल्हास्तरीय समिती निश्चित करते.
- पती, पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असल्यास त्यातील एकाची निवड झाली, तर जोडीदाराला पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेते.
- अर्जदाराचे वय ७५ आणि त्यापुढील असल्यास सोबत जोडीदार किंवा सहायक प्रवास करू शकेल.