महालक्ष्मी येथील तिरुपती अपार्टमेंट्स या चौदा मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याला शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी तत्काळ दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत मोठी वित्तहानी झाली असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. शनिवारी दुपारी ३.२४ वाजता महालक्ष्मीमधील भुलाभाई देसाई मार्गावरील तिरुपती अपार्टमेंट्स या रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला प्राप्त झाली. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी ८ फायर इंजिन, ५ पाण्याचे टँकर्स आणि एक रुग्णवाहिका धाडण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या अथक प्रयत्नांती सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळाले. आगीत ४०१ क्रमांकाच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. वायरिंग, एसी, स्वयंपाक घरातील साहित्य याचा यामध्ये समावेश आहे. शिवाय घटनास्थळी आगीच्या धुरामुळे अनिल यादव यांना श्वसनाचा त्रास झाला. घटनास्थळी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेतच त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले.
तिरुपती अपार्टमेंट्सला आग
By admin | Published: February 28, 2016 2:10 AM