Join us

चारकोप येथील तिवरांचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:06 AM

पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजी; ठाेस पावले उचलण्याची म्हाडाकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांपासून आरे येथील जंगलामध्ये आगी ...

पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजी; ठाेस पावले उचलण्याची म्हाडाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आरे येथील जंगलामध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढत असतानाच आता चारकोप येथील तिवरांच्या जंगलालाही आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी रात्री चारकोप येथे तिवरांच्या जंगलाला लागलेल्या आगीनंतर येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्या मिली शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, म्हाडाने यासंदर्भात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

चारकोप सेक्टर ८ येथील सुमारे १३६ हेक्टर जागेवर तिवरांचे मोठे जंगल वसले असून, गेल्या काही वर्षांपासून या जंगलाला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. याच परिसरात काही झोपड्या असून, त्यापुढील तिवरांच्या जंगलाला आग लागत आहे. येथील जागा बळकावण्यासाठी आग लावली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. येथील तिवरांच्या जंगलाला आग लागल्यानंतर सातत्याने याबाबतचे दूरध्वनी आम्हाला येतात. यावर काहीतरी उपाय करा, असे सांगितले जाते. मुळात चारकोप सेक्टर २ येथून हा परिसर जवळ आहे. जिथे आग लागते तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत; कारण येथे भिंत बांधण्यात आली आहे. शिवाय तिवरांचे जंगल असल्याने येथे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही किंवा जागा नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

येथील झोपडीदादा आग लावत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या वर्षात येथील तिवरांच्या जंगलाला पाच वेळा आग लागली. यावर उपाय म्हणजे ही जागा वनविभागाच्या ताब्यात दिली पाहिजे. मात्र, याबाबत काहीच कार्यवाही होत नाही. जिथे आग लागते ती जागा म्हाडाची आहे. म्हाडाने येथील तिवरांच्या जंगलाच्या संरक्षणासाठी ही जागा वनविभागाच्या ताब्यात दिली तर वनविभागाला अपेक्षित कार्यवाही करता येईल, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

* अशा घडल्या घटना

वर्ष आगीच्या एकूण घटना

२०१८ - १८

२०१९ - १४

२०२० - ११

.....................