Join us

पावसाळ्यात २२५ ठिकाणी तुंबणार पाणी!, विकासकामांमुळे मुंबईकरांची होणार गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:47 AM

महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार मुंबईतील २२५ ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

मुंबई : महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार मुंबईतील २२५ ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यापैकी ६० ठिकाणे दरवर्षी हमखास पाण्याखाली जातात. मात्र, मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. मेट्रो रेल्वे आणि विविध नागरी कामांसाठी सुरू असलेल्या अशा १७ ठिकाणांची यादी महापालिकेने तयार केली असून, तिथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.मुंबईत दरवर्षी अनेक सखल भागांमध्ये मुसळाधार पावसात पाणी तुंबते. अशी २२५ ठिकाणांची यादी तयार करून, त्यात पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यादरम्यान विशेष लक्ष देण्यात येते. ब्रिमस्टोवड प्रकल्पांतर्गत पर्जन्य जलवाहिन्यांची दर्जाेन्नती करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही पावसाळ्यात मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी तुंबत असल्याने, पाणी उपसून काढण्यासाठी पंप बसविण्यात येतात. मुंबईत मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो रेल्वे आणि महापालिकेची विविध नागरी कामे सुरू आहेत. या कामांमुळे पावसाळ्यात त्या परिसरांमध्ये पाणी तुंबून नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्राधिकरणांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. उर्वरित २०८ ठिकाणी महापालिकेची जबाबदारी असणार आहे.यंदा पालिका ५४ कोटी रुपयांचा खर्च करणारमुंबईत २२५ ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असते. यापैकी ६० ठिकाणे हमखास तुंबतात. १७ ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. वांद्रे पूर्व, भायकळा, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, गोरेगाव पश्चिम, बोरीवली पश्चिम, सायन, किंग्ज सर्कल, कुर्ला, वांद्रे, माहिम, खार, दादर, माटुंगा या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होईल.पावसाचे पाणी उपसण्यासाठी १९ पंप आहेत, तर २७९ पंप भाड्याने घेतले जातात. यासाठी यंदा ५४ कोटींचा खर्च करण्यात येईल.