टीएमटी ‘बेस्ट’ होण्यास सेनेचा खोडा
By admin | Published: July 17, 2014 01:26 AM2014-07-17T01:26:24+5:302014-07-17T01:26:24+5:30
ठाणे परिवहन सेवेचा विस्कटलेला गाडा हाती घेण्यासाठी बेस्ट प्राधिकरणाने हिरवा झेंडा दाखवला असून त्यांनी विलीनीकरणास सहमती दर्शवली आहे
ठाणे : ठाणे परिवहन सेवेचा विस्कटलेला गाडा हाती घेण्यासाठी बेस्ट प्राधिकरणाने हिरवा झेंडा दाखवला असून त्यांनी विलीनीकरणास सहमती दर्शवली आहे. परंतु, सत्ताधारी शिवसेनेने याला विरोध केल्याने ठाणे परिवहन सेवेच्या बेस्टमध्ये होणाऱ्या विलीनीकरणास खोडा घातला आहे.
ठाणे परिवहन सेवेत ३१३ बसेस असल्या तरी सध्या रस्त्यावर १४० ते १४५ च्या आसपास बसेस धावत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून परिवहनचे प्रवासी ७५ हजारांनी घटले असून उत्पन्नसुद्धा २३ लाखांवरून १८ लाखांवर आले आहे. आजही आगारात १५० हून अधिक बसेस बंद अवस्थेत आहेत. या बसेस दुरुस्तीसाठी महापालिकेने तीन कोटी देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, टप्प्याटप्प्याने या बसेस दुरुस्त केल्या जाणार आहेत. महापालिकेकडून दरवर्षी परिवहनला २५ कोटींचे अर्थसाहाय्य केले जात असतानासुद्धा परिवहनला २५ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परिवहनचे बेस्टमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर, आता बेस्टनेसुद्धा त्यानुसार अनुकूलता दर्शवली आहे. परंतु, पुढील एक ते दोन वर्षे टीएमटीच्या होणाऱ्या तोट्याचा भार पालिकेने उचलावा, असे बेस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु, परिवहन सेवा ठाणे महापालिकेचे अंग असल्याने ती बेस्टमध्ये विलीनीकरण शक्यच नसल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. परिवहनच्या बसेस दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच येत्या काही महिन्यांत २३० नव्या बसेस आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून १०० बसेस परिवहनमध्ये दाखल होणार असल्याने प्रवाशांनासुद्धा चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यात सध्या बेस्टसुद्धा डबघाईला आली असल्याने त्यात टीएमटी विलीन झाल्यास टीएमटीचेच अधिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आमचे प्रयत्न परिवहनला सक्षम करण्याचे असल्याचे मत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)