टीएमटीला वाहक मिळेनात!
By admin | Published: November 7, 2014 11:27 PM2014-11-07T23:27:30+5:302014-11-07T23:27:30+5:30
नव्याने दाखल होणा-या २३० बससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय टीएमटी अर्थात ठाणे महापालिका परिवहन सेवेने घेतला आहे.
जित मांडके, ठाणे
नव्याने दाखल होणा-या २३० बससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय टीएमटी अर्थात ठाणे महापालिका परिवहन सेवेने घेतला आहे. त्यानुसार, ४०० कंत्राटी वाहक परिवहन सेवेत घेतले जाणार आहेत. यासंदर्भातील निविदेला तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर एकही ठेकेदार पुढे आलेला नाही. टीएमटीची सध्याची स्थिती पाहता आणि यापूर्वी परिवहनमध्ये काम करीत असलेल्या ठेकेदारांची थकबाकी पाहता नव्या ठेकेदारांनीदेखील या कामाला नकारघंटा वाजविल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे टीएमटीपुढचे संकट आणखीनच वाढले आहे.
सध्या टीएमटीच्या ताफ्यात ३१३ बस असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर केवळ १६० ते १७० बस धावत आहेत. या बसमधून रोज दीड लाख प्रवासी प्रवास करीत असून टीएमटीला रोज १८ ते १९ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. आजघडीला ९५३ वाहक असून कार्यालयीन कामासाठी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने १५० वाहक लिपीक म्हणून वागळे आगारात काम करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ८०० च्या आसपास वाहक बसवर काम करीत आहेत. सध्या असलेल्या बसच्या मानाने ही संख्या पुरेशी असल्याचा दावा टीएमटीने केला आहे. परंतु, आता ताफ्यात जेएनएनयूआरएमअंतर्गत २३० बस दाखल होणार आहेत. त्यातील १० बस सध्या दाखल होऊन रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित २२० बस येत्या तीन ते चार महिन्यांत दाखल होणार आहेत. त्यामुळे या बसवर वाहकांची कमतरता जाणवणार असल्याने टीएमटीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार, खाजगी कंत्राटदारामार्फत हे ४०० वाहक घेणार आहे. यासंदर्भात, टीएमटीमार्फत एकदा निविदा काढण्यात आली होती. परंतु, तिला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे तिला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. तिसऱ्या मुदतवाढीचा कालावधी शुक्रवारी संपुष्टात आला आहे. परंतु, तरीदेखील एकही ठेकेदार पुढे आला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.