ठाणे : ठाणे परिवहनच्या बस भाडेवाढीच्या प्रस्तावाला सोमवारी गोंधळात सत्ताधाऱ्यांनी महासभेत मंजुरी दिली आहे. आता या भाडेवाढीनुसार यापुढे पहिल्या टप्प्यासाठी २ रु पये आणि त्यानंतर पुढील टप्प्यासाठी ३ रुपये आणि त्यानंतरच्या टप्प्यासाठी ५ रुपये अशी भाडेवाढ होणार आहे. आता हा प्रस्ताव परिवहन विभागाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे.ठाणे परिवहनने मार्च २०१३मध्ये पहिल्या टप्यासाठी १ रुपयांची भाडेवाढ केली होती. त्यानंतर मार्च महिन्यात भाडेवाढीचा प्रस्ताव विशेष समितीपुढे ठेवून मंजूर करुन घेतला होता. आता हा प्रस्ताव सोमवारी महासभेत मंजुरीसाठी आला होता. यावेळी विरोधकानी केलेल्या गोंधळात सत्ताधाऱ्यांनी ठाणे परिवहनच्या दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. डिझेलच्या वाढत्या भावामुळे सुरुवातीला ही भाडेवाढ करण्यात येत असल्याचे परिवहनने सांगितले होते . डिझेलचे दरवाढीचे प्रमाण हे सरासरी २४.०६ टक्के आणि सीएनजी दरवाढीचे प्रमाण हे १८.४१ टक्के एवढे आहे. तसेच टायर, स्पेअरपार्ट व इतर वस्तूंचे दर वाढल्याने ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
टीएमटी भाडेवाढ: महासभेत मंजूर
By admin | Published: April 13, 2015 10:48 PM