मुंबई : गेल्या वर्षभरात ऑनलाइन व्यवहार करणारे हजारो नागरिक भामट्यांना बळी पडले. योग्य तांत्रिक ज्ञान नसल्याने १ लाख ११ हजार ३५७ हून अधिक नागरिक ऑनलाइन लुटीच्या जाळ्यात अडकले. या नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर त्वरित पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे या सर्वांचे एकूण २६ कोटी ४८ लाख २२ हजार २०९ रुपये परत मिळवून देण्यात मुंबई पोलिस दलाच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे.
ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहा. गुगलवरील माहितीची शहानिशा करावी. कुठल्याही क्रमांकावरून आलेल्या लिंकला क्लिक करू नका, डेबिट, क्रेडिट कार्डचा नंबर, सीव्हीव्ही सांगू नका अन्यथा फसवणुकीला बळी पडाल, असेही आवाहन पाेलिसांनी केले आहे.
गुगलवर पसरवले लुटीचे जाळे :
ऑनलाइनच्या स्मार्टनेसच्या युगात प्रत्येकाच्या हाती मोबाइल असल्याने अनेक जण ऑनलाइन व्यवहाराला पसंती देत आहेत. ही बाब लक्षात घेत भामट्यांनी नागरिकांना लुटण्यासाठी गुगलवर जाळे पसरविले आहे.
नामांकित हॉटेल, दुकाने, बँका, कंपन्यांसह तीर्थस्थळांच्या नावाने बोगस वेबसाइट भामट्यांनी तयार केल्या आहेत. या वेबसाइट गुगल सर्च इंजिनमध्ये टॉपला दिसत होत्या. त्यामुळे अनेक जणांची ऑनलाईन फसवणूक झाली, अशी माहिती मुंबई पोलिस दलाच्या सायबर गुन्हे शाखेने दिली.
सावधान! माहितीची शहानिशा करा...
गुगलवर माहितीचा खजिना आहे, हे जरी सत्य आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी गुगलवर सर्च केले जाते. याचाच गैरफायदा भामट्यांनी घेतला आहे. नागरिकांचा वाढता कल पाहता लुटारूंनी बोगस वेबसाइट, नंबर गुगलवर अपलोड केले आहेत. तेही सर्च इंजिनमध्ये टॉपला रन करत होत्या, हे आतापर्यंत मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवायांमुळे उघडकीस आले आहे. त्यामुळे गुगलवर असलेली माहितीची शहानिशा करूनच व्यवहार करा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर यांनी केले आहे.
ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यावर त्वरित १९३० या टोल फ्री कमांकावर अथवा http://cybercrime.gov.in येथे तक्रार करा. त्यामुळे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे - डॉ. डी. एस. स्वामी,सायबर गुन्हे, मुंबई पोलिस